
सामना प्रतिनिधी, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 10 लाख 74 ह़जार बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही टक्केवारी 94 इतकी असून, विभागात नाशिक जिल्हा प्रथम, तर राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.
जिल्हा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा समन्वयक कमलाकर लष्करे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षण व एकात्मिक बालविकास अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत ग्रामीण भागात 94 टक्के, नाशिक महापालिका हद्दीत 74.4, मालेगाव महापालिका हद्दीत 48.3, जिल्हा शासकीय व उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत 98.3 टक्के लसीकरण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मोहिमेला सर्व सरकारी व खाजगी शाळा, तसेच अंगणवाडीमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱया तालुका आरोग्य अधिकाऱयांचे अभिनंदन करण्यात आले.
सर्वेक्षण आवश्यक
प्रत्येक मूल महत्त्वाचे असल्याने सर्वांपर्यंत ही मोहीम पोहचविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. घराघरापर्यंत जावून सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. यासोबतच ऊस तोडणी व वीटभट्टी कामगार अशा स्थलांतरीत होणाऱ्या कुटुंबातील मुलांना या मोहिमेअंतर्गत समाविष्ट करुन घेण्यात यावे, असे आवाहन डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले.


























































