मिठी होणार स्वच्छ सुंदर वर्षभर होणार नदीची स्वच्छता; तरंगत्या कचऱयाची यांत्रिक सफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिठी नदीतील गाळ आणि कचऱयाची समस्या सोडवण्यासाठी फिनलॅण्डचे कचरा गोळा करणारे अद्ययावत कचरावेचक यंत्र मिठी नदीत कार्यरत झाले असून त्यामुळे नदीवर तरंगणाऱया कचऱयाची विल्हेवाट लावली जात आहे. हे यंत्र वर्षभर मिठी नदीतील तरंगता कचरा गोळा करणार आहे.

मिठी नदीत टाकल्या जाणाऱया कचऱयामुळे, गाळामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे मिठी नदीला तिचे जुने वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी बाराही महिन्यांचा स्वच्छता प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मिठी नदी स्वच्छता प्रकल्प हा यूएनटीआयएल (यूएन ग्लोबल पल्स), व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलॅंड लि., रिव्हर रीसायकल आणि ‘अर्थ 5 आर’ या हिंदुस्थानातील पर्यावरणीय मोहिमांमध्ये सक्रिय असलेल्या संस्थांच्या जागतिक स्तरावर संयुक्त विद्यमाने चालवला जात आहे.  या उपक्रमासाठी हुतामाकी या कंपनीने या प्रकल्पाला 6 लाख युरोची देणगी दिली आहे.

या प्रकल्पामध्ये व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँडला तरंगणारा कचरा आणि ऋतूनुसार स्वच्छता कार्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्याच्या बाबतीतदेखील माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नदीतील भविष्यातील सफाईची कामे आणि पुनर्वापर प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे करता येणार आहे. फिनलँडमधील कंपनी क्लीनटेक स्टार्टअप रिव्हरसायकलने पाण्यावरील कचरावेचक यंत्राचा शोध लावला आहे.

देणगीचा असा वापर होणार

  • रिव्हर क्लीनर सुरू करून ते सेट अप करणे
  • कचऱयाची परिणामकारकरित्या विल्हेवाट लावणे
  • पुनर्वापरासाठी कार्यशाळा आयोजित करणे

या प्रकल्पाद्वारे प्लास्टिक आणि तरंगत्या कचऱयाचे संकलन करतानाच स्थानिकांना ज्ञान व उपजीविकेचे साधन प्राप्त करण्यासाठी सक्षम बनवणे जाणार आहे.
– सुदीप माळी, व्यवस्थापकीय संचालक, हुतामाकी

या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे रासायनिक पुनर्वापराबद्दल परीक्षण करण्यात मदत होणार आहे
.- जुक्का सॅसी, व्हीटीटी टेक्निकल रिसर्च सेंटर ऑफ फिनलँड