MLA disqualification case – विधानसभा अध्यक्ष विलंब का करत आहेत? अनिल देसाईंचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला. सर्वकाही स्पष्ट दिसत असताना विधानसभा अध्यक्ष विलंब का करत आहेत, असा सवाल देसाई यांनी केला. दिल्ली येथे ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.

सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी दिलेल्या निकालामध्ये अनेक निष्कर्ष मांडले आहेत. काय वैध काय अवैध, व्हीप कोणाचा वैध हे सर्व यात दिले असून योग्य वेळेत निर्णय घ्या असे निर्देशही दिले आहेत. मणिपूरच्या एका प्रकरणातही कालमर्यादा दिली होती. आता 90 दिवसांचा काळ कधीच संपला आहे. आम्ही न्याय मागतोय. न्याय देण्याचे तुमच्या हातात आहे, तुम्ही विलंब का करताय हे संपूर्ण देश पाहतोय. राज्यामध्ये कायदा आहे की नाही असा प्रश्न लोकांना पडला आहे, असेही देसाई म्हणाले. तसेच सर्व गोष्टींची कायद्याने पडताळणी करण्याचा अधिकार तुमचा आहे, पण आतापर्यंत निर्णय झाला पाहिजे होता, असेही देसाई म्हणाले.

पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णयही चुकीचा आहे. याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात निष्कर्ष मांडले आहे. आमदारांच्या संख्येवरून पक्षाचे आणि चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकत नाही. इतरही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पक्षाची घटना, पक्षाची जडणघडण, पदाधिकारी याबाबत निवडणूक आयोगाने कागदपत्रांची मागणी केली होती. आम्ही लाखोंच्या संख्येने कागदपत्र निवडणूक आयोगाला दिली. सर्व गोष्टींची पूर्तता केली, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असेही देसाई यावेळी म्हणाले.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मूळ शिवसेना असणाऱ्या शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कडून आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात दाखल याचिकेवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीला उशीर होत असून त्यांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर काय टीपण्णी करते याकडेही अवघ्या महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा लागलेल्या आहेत.