मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मनसेचे जुन्नरमधील एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी सोमवारी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. घरची…शिवसेनेची ओढ लागल्याने परतल्याची भावना सोनवणे यांनी व्यक्त केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून तसेच हाती भगवा देऊन त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. बाहेर गेलात तरी तुमच्या मनात भगवा कायम होता म्हणून परतला आहात. आता जुन्नर, शिरूरमध्ये लोकसभा-विधानसभेत विजयश्री मिळवूनच राहा, अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

शिवसेना भवन येथे सोनवणे यांच्यासह जुन्नर, पुण्यामधील मनसे, राष्ट्रवादी तसेच भाजपमधील हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शिवसेनेबाहेर गेलात तरी आनंदी होतात का? तुमच्या मनात भगवा कायम होता. त्यामुळेच तुम्ही परत आला आहात. आपल्या घरात कितीही रुसवे-फुगवे असले तरी कुणी आपलं घर फोडायला निघत नाही. तेव्हा ही एकजूट कायम ठेवून निवडणुकीत विजयश्री खेचून आणा. जुन्नर आणि शिरूरमध्ये जाहीर सभा घेऊन अनेक मुद्दय़ांवर प्रतिस्पर्ध्यांवर आसुड ओढणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, डॉ. नीलम गोऱहे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे आदी उपस्थित होते.

शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांमध्ये भाजपचे रामदास धनवटे, मनसेचे अशोक खांडेभराड, राष्ट्रवादीचे पंकज गावडे, त्याचप्रमाणे सुनील मेहेर, नेताजी डोके, विश्वास आमले, नयन डोके, जानकुशेठ डावखर, धनंजय डुंबरे, सूर्यकांत ढोले, स्वाती ढोले, राजेंद्र मुळे, जयवंत घोडके, संतोष वाघ, उद्योजक सह्याद्री भिसे, बाळासाहेब शेलोत, सरपंच संतोके केदारी, संगीता मुगदम, दीपाली दाते, महेश शेळके, दत्ता गवारी यांचा समावेश होता.