
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद हळूहळू घटत चालला आहे, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.
दिल्लीतील माहिती अधिकार कार्यकर्ते युसूफ नक्वी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला श्रोते कसा प्रतिसाद देतात याची माहिती विचारली होती. त्याला उत्तर देताना ऑल इंडिया रेडिओने आकडेवारी सादर केली आहे.
आरटीआयमधील माहितीनुसार ‘मन की बात’ कार्यक्रमाला 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरुवात झाली होती. 2015 मध्ये 30.82 टक्के श्रोते लाभले होते. मात्र 2016 मध्ये ही संख्या घटून 25.82 टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर 2017 मध्ये या कार्यक्रमाकडे श्रोत्यांचा ओढा आणखी कमी झाला आणि संख्या 22.67 टक्क्यांवर आली. म्हणजे दोन वर्षांत श्रोत्यांची टक्केवारी 8 टक्क्यांनी घसरली आहे. या कार्यक्रमाला सर्वाधिक श्रोते हे बिहारच्या पाटणा येथून मिळतात तर तिरूअनंतपूरम या केंद्रावरून एकही श्रोता या कार्यक्रमाला मिळत नाही. तसेच अहमदाबाद (गुजरात), नागपूर (महाराष्ट्र), जयपूर (राजस्थान), रोहतक (हरियाणा), शिमला (हिमाचल प्रदेश), भोपाळ (मध्य प्रदेश) आणि जम्मू (जम्मू-कश्मीर) या केंद्रांवरून या कार्यक्रमला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये भाजपची सत्ता या काळात होती. एफएम आइणि रेडिओ ऐकणाऱ्या एकूण श्रोत्यांपैकी 20 ते 30 टक्के लोकांनीच हा कार्यक्रम ऐकला आहे.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर देशातील जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात कार्यक्रमाची सुरुवात केली होती. हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. 25 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या कार्यक्रमात मोदींनी मार्च आणि एप्रिलचे मुद्देही घेतले होते. तसेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आपण पुन्हा भेटू असा संदेश श्रोत्यांना दिला होता.

























































