मोहाचे लाडू

गोपाळ पवार, मुरबाड

मोहाच्या फुलांतील गोडव्याचा आता खऱया अर्थाने सदुपयोग होऊ लागला आहे… भरपूर पोषणमूल्य असलेल्या लाडवांतून…

मोहाचं झाड म्हणजे आदिवासींचा कल्पवृक्षच डोंगराळ भागात राहणाऱया ठाकूर आणि कातकरी जमातीचा निर्वाहच कंदमूळं, फळं आणि पालापाचोळा अशा जंगल संपदेवर चालतो. त्यातील एक उपयुक्त झाडं म्हणजे मोहाचं झाड. या मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते. त्यामुळे हे झाड नेहमीच बदनाम ठरलं. पण या मोह फुलांचे आहार मूल्य मनुका आणि दुधापेक्षाही जास्त असल्याचं सिद्ध झाल्याने ही फुले कुपोषणावर संजीवनी ठरू लागली आहेत. त्यामुळेच पूर्वी दारू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱया या फुलांपासून आता पौष्टिक लाडू बनवण्याचा वसा आदिवासी महिलांनी घेतला आहे. हे लाडू कुपोषणमुक्तीसाठी उपयोगी पडतीलच, पण त्यापासून स्थानिकांना मोठय़ा प्रमाणावर रोजगार मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

मुरबाड तालुक्यातील 80 टक्के भूभाग हा डोंगराळ आणि दऱया-खोऱयांनी व्यापलेला. या तालुक्यातील जंगलात मोहाची झाडे मोठय़ा प्रमाणावर आहेत. एकेकाळी या मोह फुलांपासून दारू बनवण्याचा धंदा जोरात होता. त्यातून आदिवासी दोन पैसे गाठीला बांधत. भूक लागली की, आदिवासी मोहाची ताजी टवटवीत फुले खाऊन उदर भरण करत.

आदिवासींची पुढची पिढी शिकू लागली आणि त्यांच्या राहणीमानातही हळूहळू बदल होऊ लागले. इतरत्र रोजगार मिळू लागल्यामुळे मोहाच्या फुलापासून दारू बनवण्याचा धंदा मागे पडला. मोहाच्या झाडाला एप्रिल ते मे या दोन महिन्यांच्या हंगामात फुले येतात. मोह फुलांच्या सालींची चवदार भाजी बनवली जाते. फुलाच्या आत असलेल्या बीला मोहरी म्हणतात. ही मोहरी वाळवून त्यापासून तेल काढतात. हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. या तेलाचा उपयोग नवजात बाळाला अंघोळीपूर्वी मालिश करण्यासाठी केला जातो.

मोह फुलापासून दारू बनवण्याचा धंदा संपला मग या फुलांचे करायचे काय, असा प्रश्न साहजिकच निर्माण झाला, पण गरज ही शोधाची जननी असते याचा प्रत्यय इथे आला. या परिसरात काम करीत असलेल्या वन निकेतन या संस्थेचे काही कार्यकर्ते व स्थानिक आदिवासींचा गट गडचिरोलीच्या दौऱयावर गेले होते. तेथे स्थानिक आदिवासी मोह फुलापासून वेगवेगळे पदार्थ कसे बनवतात याचा अभ्यास केला. मनुके आणि दुधापेक्षाही सक्षम आहारमूल्य आणि प्रथिने, जीवनसत्व व उर्जा मोह फुलात असतात. हे त्यांना तेथेच कळले.

मुरबाडमध्ये परतल्यावर यावर विचारविनिमय झाला आणि या मोह फुलापासून पोषणयुक्त लाडू बनवण्याची कल्पना साकारली. मार्च ते मे दरम्यान जंगलात पडलेल्या मोह फुलांचा खच गोळा करून त्याचा साठा करण्यात आला. ती फुले सुकवण्यात आली. आणि त्यापासून आदिवासींच्या घराघरात कुपोषणावर मात करणारे हे पौष्टिक लाडू बनवण्याचा गृह उद्योगच सुरू झाला. वनविभागाच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू झाला आहे. आणि मोह फुलापासून बनवलेले हे लाडू नाणेघाटाच्या प्रवेशद्वाराजवळ वनविभागाने विक्रीलाही ठेवले आहेत. नगर-कल्याण या मार्गाने ये-जा करणारे प्रवाशीही आवर्जून थांबून लाडूंचा हा खाऊ सोबत नेतात. यामुळे आदिवासींना रोजगार मिळून दोन पैसे त्यांच्या खिशात खुळखुळू लागले आहेत.