
महिलांचे लैंगिक शोषण, फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याला 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भोंदू खरातचा ताबा मिळावा यासाठी तपास यंत्रणेने खरातला आज सत्र न्यायालयात हजर केले होते.
गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाने त्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत अटक केली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्याला विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी ईडीने माहिती देताना सांगितले की, सध्या खरातची अधिक चौकशीसाठी कोठडीची गरज नाही, मात्र भविष्यात गरज पडल्यास पुन्हा कोठडीची मागणी केली जाईल. न्यायालयाने याची दखल घेत आरोपी खरात याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
काय आहेत ईडीचे आरोप
घोटाळ्याचा मास्टरमाइंड आणि मुख्य लाभार्थी अशोक खरात असून तब्बल 47.74 कोटी रुपयांच्या काळ्या पैशांचा गैरव्यवहार केला आहे. तसेच त्याच्याकडे येणाऱया महिलांच्या संमतीशिवाय त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून राहता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेत 60 वेगवेगळी बँक खाती उघडली. यातील 43 खाती मे 2021 साली एकाच दिवशी उघडण्यात आली होती व या खात्यांमधून कोट्यवधींचे रोख व्यवहार झाले. खरातने भाविकांची धार्मिक फसवणूक आणि खंडणीच्या माध्यमातून हा पैसा कमावला. त्या काळ्या पैशांतून त्याने मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केली.


























































