
खर्डीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या मोकडाने आज थेट नाक्यावरील खर्डी हायस्कूलवर हल्लाबोल केला. वर्गात घुसून तोडफोड सुरू केल्यामुळे घाबरलेले विद्यार्थी आणि शिक्षक शाळा सोडून बाहेर पळाले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाची बोरिवली येथील रेस्क्यू टीम आणि सर्पमित्रांनी खर्डीत धाव घेत माकडाला पकडण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली. मात्र माकडाने वन अधिकारी आणि अन्य नागरिकांवर हल्ले करून त्यांचे कडाडून चावे घेतले. त्यात पाचजण जखमी झाले. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर या माकडला पकडण्यात रेस्क्यू टीमला यश आले आणि खर्डीकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
खर्डीत आलेल्या माकडाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली. माकड आचानक घरात घुसून तोडफोड करीत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करीत होते. खर्डीतील लहान मुलांना माकडाने विशेष लक्ष केले होते. त्यामुळे पालकांमध्ये घबराट पसरली होती. गेल्या आठ दिवसांपासून धिंगाणा घाल णाऱ्या माकडाने आज नाक्यावरील खर्डी हायस्कूलवर हल्लाबोल केला. माकडाने वर्गांमध्ये घुसून तोडफोड सुरू केली.
- माकडाने धुमाकूळ घातल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाची बोरिवली येथील रेस्क्यू टीम व धसई येथील सर्पमित्र अर्जुन थोराड यांनी खर्डीत धाव घेत माकडाला पकडण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली. मात्र माकडाने त्यांच्यावरही हल्ला केला.
- माकडाच्या हल्ल्यात रेस्क्यू टीममधील वन कर्मचारी मनोहर मेहर व दीपक थापड यांच्यासह सुनील लाडे, भागवत वाघ आणि मयूर बिन्नर हे जखमी झाले. माकडाच्या हल्ल्यात काही विद्यार्थीही किरकोळ जखमी झाले आहेत.

























































