बेनेटचे उर्वरित अवयव शोधण्यासाठी घेणार मच्छीमारांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेनेट रिबेलो यांचे उर्वरित अवयव शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस सोमवारपासून सुरुवात करणार आहेत. त्याकरिता स्थानिक मच्छीमारांची मदत घेतली जाणार आहे. शोधमोहिमेकरिता पोलिसांचे पथक तयार केले जाणार आहे.

गेल्या आठवडय़ात माहीम दर्ग्याच्या मागील बाजूस एका सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडले होते. या प्रकरणी माहीम पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्याचा समांतर तपास युनिट-5 ने करून दोघांना अटक केली. चौकशीत त्या दोघांनी बेनेटच्या हत्येची कबुली दिली. रिया आणि एका अल्पवयीन मुलाने बेनेटचे अवयव कापले. कापलेले अवयव सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमन कॉलनी येथील नाल्यात टाकले होते. त्यापैकी एक बॅग वाहत माहीम दर्गा येथे आली होती. पोलिसांना बेनेटचे उर्वरित अवयव सापडले नाहीत. त्या दोघांनी ते अवयव नेमके कुठे टाकले याबाबत पोलीस रियाची चौकशी करत आहेत. उर्वरित अवयव शोधण्यासाठी पोलीस आता मच्छीमारांची मदत घेणार आहेत. सोमवारपासून पोलीस अवयव शोधण्यास सुरुवात करणार आहेत.

तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेनेटच्या भावाला सुटकेसमध्ये सापडलेले अवयव ओळख पटवण्यासाठी बोलावले होते. काही वर्षांपूर्वी बेनेटवर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या पायात प्लेट टाकली होती असे त्याच्या भावाने पोलिसांना सांगितल्याचे समजते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच फॉरेन्सिक लॅबच्या टीमने घटनास्थळी जाऊन काही रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. पोलिसांना काही घटनास्थळी पुरावे मिळाल्याचे वृत्त आहे.

हत्येचा उद्देश अस्पष्ट
बेनेटच्या हत्येचा अद्याप तरी उद्देश स्पष्ट झालेला नाही. त्याची हत्या संपत्तीच्या वादातून झाली असावी का याचा तपास पोलीस आता करणार आहेत. बेनेट हे पूर्वी आखाती देशात काम करत होते. सहा वर्षांपूर्वी ते मुंबईत आले होते. ते एकटे राहत असल्याने त्यांनी काही वर्षांपूवी रियाला दत्तक घेतले होते. बेनेटच्या संपत्तीची रियाला माहिती समजली होती.