मुलुंड रेल्वे स्थानकावर अर्धा तास बत्ती गूल

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकावरील बत्ती गूल झाल्याचा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला. या घटनेमुळे रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही, मात्र ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर काळोख पसरल्यामुळे या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

मोबाईलचे टॉर्च लावून रेल्वेमध्ये चढउतार करण्याची वेळ प्रवाशांवर आली. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी 7 च्या सुमारास मुलुंड स्टेशनवरील विद्युत पुरवठा खंडीत झाला आणि 7.22 च्या सुमारास पूर्ववत झाला. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, कोणत्या कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाला याची माहिती आम्ही घेत आहोत, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.