26/11 मुंबईच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘26/11’च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त असताना इसाक बागवान यांनीच एनएसजीचे कमांडो येईपर्यंत नरीमन हाऊसचा किल्ला यशस्वीरीत्या लढवला होता. बागवान यांनी त्यावेळचा थरार त्यांच्या शब्दात मांडला आहे. तो आम्ही सामनाच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.

26-11च्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे माझ्या कामाला सुरुवात केली. दुपारी मंत्रालयावर येणाऱ्या मोर्चांना हाताळले. त्या दिवशीची सगळी कार्यालयीन कामे आटोपताना रात्रीचे साधारण साडेआठ वाजले. मी ऑफिसमधून निघालो. रोजच्याप्रमाणे मी नरिमन पॉंईट येथे जाऊन इव्हिंनग वॉक घेतला. साधारण सव्वानऊ-साडेनऊच्या सुमारास मी घरी पोहोचलो. पत्नीला सांगितले की, ‘मी फ्रेश होऊन येतो. तू जेवण वाढ.’ मी बाथरूमधून बाहेर पडलो. तेवढ्यात मोबाईल वाजला. बघितले तर तो फोन मुंबई कमिश्नर साहेबांचा होता. मी फोन घेताच कमिशनर साहेब म्हणाले, ‘बागवान… लिओपोल्ड रेस्टॉरन्टमध्ये गोळीबार सुरू झालाय. ताबडतोब तुम्ही त्या ठिकाणी रवाना व्हा.’

एवढे बोलून फोन कट् झाला. मी ताबडतोब कपडे करता करता माझे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होल्स्टरमध्ये ठेवत माझ्या सरकारी गाडीच्या ऑपरेटर साळुंकेला कॉल दिला. लिओपोल्ड रेस्टॉरन्ट हे माझ्या घरापासून जवळ असल्याने मी गाडीची वाट न पाहता निघालो. मी बिल्डिंगखाली उतरलो. तेवढ्यात माझा कॉल मिळाल्याने मला घेण्यासाठी क्वालिस गाडी घेऊन ड़्रायव्हर तडवी आणि ऑपरेटर साळुंके सोबत आले. साळुंके मला म्हणाला, `सर… तुम्हाला घरी सोडून आम्ही जायला निघालो, तर पुढे ट्रॅफिक जाम झालेला होता. काय घडलंय हे कळत नव्हतं. कोण म्हणत होतं की, गोळीबार झालाय… आम्ही तुम्हाला रिपोर्ट करणार होतो एवढ्यात तुमचा फोन आला.’

मी त्या दोघांना लिओपोल्ड रेस्टॉरन्टमध्ये गोळीबार झाल्याचे सांगितले. आमचा हा संवाद सुरू असेपर्यंत माझ्या ड़्रायव्हरने सायरन वाजवत गाडी लिओपोल्ड रेस्टॉरंटपाशी आणली. त्या ठिकाणी प्रचंड गर्दी जमलेली होती. एकच कोलाहल माजलेला होता. अशा परिस्थितीत पोलीस कर्मचारी जुन्या ताजमहाल हॉटेलच्या दिशेने धावत जाताना दिसले. तशी मी गाडी जुन्या ताजमहालच्या दिशेने घेतली. मी हॉटेल डिप्लोमॅटच्या कॉर्नरला पोहोचलो, तेव्हा त्या ठिकाणी आमची ‘कुलाबा वन’ ची पोलीस गाडी थांबलेली दिसली. मला पाहताच कुलाबा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील देशमुख पुढे आले. ते मला म्हणाले, ‘सर… लिओपोल्ड रेस्टॉरन्टमध्ये अंदाधुंद गोळीबार करून दोन अतिरेकी जुन्या ताजमहालमध्ये नॉर्थ कोर्ट हॉस्पिटलच्या बाजूने घुसलेत.’
‘चला … देशमुख आपण जुन्या ताजमध्ये जाऊया.’
माझ्या या बोलण्यावर देशमुख म्हणाले,
‘सर… अतिरेक्यांकडे स्वयंचलित हत्यारे आहेत.’
क्षणभर मी विचारात पडलो. तेवढ्यात मला ‘थाड्ऽऽ…थाड्ऽऽ असे गोळीबाराचे आवाज आले. अतिरेक्यांनी जुन्या ताजमहाल हॉटेलच्या समोर नॉर्थ कोर्ट हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या भिंतीवर गोळीबार केला होता. याचे कारण त्या ठिकाणी काही कोळ्यांच्या मुलांनी त्यांना आत शिरताना पाहिले होते. मात्र, गोळीबार सुरू होताच ती मुले रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाली. मी काही क्षण विचार करत असताना वायरलेसवर मेसेज मिळाला की, डेप्युटी कमिशनर विश्वास नांगरेपाटील साहेब हॉटेल ताजमहालमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या मदतीला जाण्याचा मी विचार केला. तेवढ्यात ‘धडाम्म ऽऽ’ असा कानठळ्या बसणारा आवाज आमच्या कानावर पडला. तसे आमच्या सगळ्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. ‘बॉम्ब ब्लास्ट’

कुलाबा ससून डॉकच्या दिशेने तो आवाज आला होता. या स्फोटानंतर अवघ्या एक-दीड मिनिटात मला कुलाब्याच्या पास्ता लेनमध्ये राहणाऱ्या माझा खबऱ्या सलीमचा फोन आला.
‘बोल सलीम’
‘साब… पाचपायरी इलाके में पेट्रोल पंप के पास बम ब्लास्ट हुवा है. आप जल्दी आईये… वहाँकी पब्लिक बहोत डर गयी है.’
सलीमकडून ही खबर मिळताच मी पाचपायरी, एसबीएस रोड, कुलाब्याच्या दिशेने त्वरित निघालो. काही मिनिटांत आमची क्वालिस इंदूमती साखरीकर मार्ग आणि एसबीrएस रोडच्या नाक्यावर पोहोचली. आमची गाडी पाहताच स्थानिक रहिवाशांनी गाडीला गराडा घालत बोलण्यास सुरुवात केली.

‘बागवान साब… पाचपायरी एसबीएस रोड के पेट्रोलपंप के पास टेररिस्टोंने हॅन्डग्रेनेड पेâका… उस में एक आदमी मर गया.’
‘और…साब…एक शॉप तहेसमेहस हो गया.’
‘साब…उन लोगोने कुलाबा चेंबर्स में एक बोहरी फॅमिली को मारा डाला. और तीन लोगों को खत्म कर डाला उन लोगोने.’
‘और साब…अभी टेररिस्ट लोग पाचपायरी गल्ली के नरिमन हाऊस में घुस गये है.’
‘वहाँ से उन्होंने एक बम बिल्डिंग के निचे फेका… उस में साब… एक आदमी मर गया.’
या नरिमन हाऊसचा इतिहास मला आधीपासून माहीत होता.
कुलाब्यातील पाचपायरी गल्लीच्या तोंडावर पूर्वी ‘छाबड हाऊस’ या नावाचा बंगला होता. गुलशन खंबाटा ही सुमारे ऐंशी वर्षांची पारशी महिला त्या बंगल्याची मालकीण. त्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या बाजूच्या असणाऱ्या ‘रवींद्र मॅन्शन’ या इमारतीत राहत होत्या. पतीचे निधन झालेल्या खंबाटा मॅडमची एक मुलगी परदेशात स्थायिक होती. मुंबईत त्या ‘ड़्रग अ‍ॅडिक्ट’ मुलासोबत रहात होत्या. मुलगा पैशासाठी आईला त्रास देत होता. यामधून मार्ग काढण्यासाठी खंबाटा मॅडम यांनी एमएन सिंग साहेबांना भेटून मदत मागितली होती. मी त्या वेळेस मरीन ड़्राईव्ह पोलीस स्टेशनशी संबंधित असल्याने खंबाटा मॅडमचा आणि माझा परिचय झाला. त्यांना आधार देण्यासाठी मी रोज न चुकता एक कॉन्स्टेबल यांच्या घरी विचारपूस करण्यासाठी पाठवत होतो. त्यामुळे त्या माझ्यावर खूष होत्या. एक दिवस त्या माझ्याकडे आल्या. आणि मला म्हणाल्या.
‘सर, आय नीड यूवर हेल्प.’

पाचपायरी गल्लीच्या तोंडावर असणारा त्यांच्या मालकीचा ‘छाबड‘ हा बंगला सध्या रिकामा असल्याने खंबाटा यांच्याच रवींद्र मॅन्शन या इमारतीत राहणाऱ्या एका बँक मॅनेजरने तो बंगला विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. त्या बँक मॅनेजरने त्या काळात नुकतीच बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली होती. एकाच बिल्डिंगमध्ये राहणारा शिवाय बँक मॅनेजर असणारा सुसंस्कृत माणूस भेटल्याने श्रीमती खंबाटांनी कायदेशीर कागदपत्र करून आपला ‘छाबड‘ हा बंगला त्या बँक मॅनेजरच्या हवाली केला. त्या पोटी खंबाटा बार्इंना त्याने काही लाख रुपये दिले. त्यानंतर त्या बँक मॅनेजरने तो बंगला जमिनदोस्त केला. मग त्या ठिकाणी बिल्डिंग बांधण्याचे विकास काम त्यांनी सुरू केले. मात्र, त्यांनी खंबाटाबार्इंना व्यवहाराची पुढील रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यात खरी गोम अशी होती की त्या बँक मॅनेजरनी खंबाटा मॅडमच्या ड्रग्ज अ‍ॅडिक्ट मुलाला पटवले होते. हा सगळा प्रकार मला समजल्याने मी कायद्याच्या चौकटीत राहून बँक मॅनेजरची कानउघडणी केली. त्यामुळे त्यांनी त्या काळात खंबाटा मॅडमना आणखी सहा लाख रुपये दिले होते. पुढे त्या बँक मॅनेजरांनी ‘छाबड’ बंगल्याच्या जागेवर जी बिल्डिंग बांधली ती संपूर्ण ज्यू धर्मीय मंडळींना चांगला मोबदला घेऊन विकून टाकली. त्याच बिल्डिंगचे नाव ‘नरिमन हाऊस.’

isaque-bagwan-on-the-spot

या नरिमन हाऊसमध्ये अतिरेकी घुसल्याने मी अधिकच धास्तावलो. कारण सहा मजल्यांच्या या बिल्डिंगमध्ये फक्त ज्यू नागरिक रहात होते, तेव्हा हा हल्ला नक्कीच पॅलेस्टाईन वगैरेंनी केला असणार असा मी अंदाज बांधला. प्रत्येक क्षण माझ्यासाठी महत्त्वाचा होता. अशा परिस्थितीत नरिमन हाऊसचे लाईट गेले होते. त्यामुळे अतिरेकी किती आहेत? तसेच बिल्डिंगमध्ये किती लोक अडकून पडलेत? याचा काही अंदाज येत नव्हता. नरिमन हाऊसमधून अतिरेक्यांच्या स्वयंचलित बंदुका आमच्यावर आग ओकत होत्या. मी ताबडतोब कंट्रोल रूमला कॉल दिला.
‘एसीपी बागवान बोलतोय… पाचपायरी मेन रोड इथे ब्लास्ट झालेला आहे, मला कुठलीही वायरलेस ताबडतोब पाठवा.’
कंट्रोलरूममधून उत्तर मिळाले. ‘तुमच्यासाठी फलटण रोडची… ‘एमआरए वन’ पाठवत आहे… ओव्हर.’

पुढील मदत मिळेपर्यंत मी त्या परिसरात राहणाऱ्या कोळी मित्रांखेरीज रमेश दोशी, पुरण दोशी, नवीनमल जैन यांच्याशी संवाद साधला. कारण कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी मी दोन वेळा काम केले असल्याने तिथली बहुतेक मंडळी मला चांगलीच ओळखत होती. शिवाय त्या परिसरातील गल्लीबोळाची मला खडान्खडा माहिती होती. मी सगळ्यांना म्हणालो,
‘पोलीस फोर्स येईपर्यंत आपण आसपासच्या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढूया.’
‘चलो साब…’

एक भारतीय जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे आबालवृद्ध प्राणाची तमा न बाळगता पुढे सरसावले. नरिमन हाऊस मधून अतिरेक्यांचा गोळीबार सुरू होता. मात्र, त्याला न घाबरता स्थानिक रहिवाशांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला साथ दिली. नरिमन हाऊसच्या आजूबाजूच्या इमारतीत राहणाऱ्या एक एक रहिवाशाला आम्ही बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्या हादरलेल्या लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी पोहोचवले. त्या दरम्यान नरिमन हाऊसच्या गेटवर ब्लास्ट करून अतिरेक्यांनी इमारतीची कम्पाउंड वॉल तोडली. त्या बॉम्बस्फोटात एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रीचा फायदा घेऊन अतिरेकी आमच्यावर गोळीबार करत होते, तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मी कंट्रोलरूममध्ये सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या राकेश मारीया साहेबांना फोन केला.’ सर… अतिरेक्यांशी दोन हात करायला मला फोर्स पाहिजे.

माझे हे वाक्य ऐकताच मारीया साहेब म्हणाले,
‘बेटा तू हिलना नहीं वहाँ से… मैं तुम्हारी मदत के लिए एसआरपी फोर्स भेजता हूँ.’
‘सर, आप निश्चिंत रहिये. मैं यहाँ से हिलूंगा नहीं. जल्दी फोर्स भेज दिजीये.’
मी मारीया साहेबांचा फोन ठेवला. काही मिनिटांतच फलटण रोडची `एमआरए वन’ माझ्या मदतीला आली. मी फलटण रोडच्या `एमआरए वन’च्या पी. एम. शिदेंशी संवाद साधला.
‘शिंदे साहेब… तुमच्याकडे किती फोर्स आहे?’
‘सर… माझ्याकडे एसएलआर गन्स्चे तीन कॉन्स्टेब्लस आहेत.’
मी मनात म्हटले की पुढला फोर्स मिळेपर्यंत या टीमला घेऊन काम सुरू करू. मी ताबडतोब त्या तीन कॉन्स्टेबल्सना नरिमन हाऊसच्या आजूबाजूला असणाऱ्या इमारतींमध्ये अशा पोझिशन्स दिल्या की, अतिरेक्यांच्या हल्ल्याला त्यांना त्यांच्या एसएलआर गन्सने प्रत्युत्तर देता येईल. साधारण अध्र्या तासात मारीया साहेबांनी एसआरपीच्या आठ नऊ तरूण जवान मुलांची टीम माझ्या मदतीला पाठवली. सगळ्यांकडे मस्केट थ्री नॉट थ्री होती. त्यांच्या सोबत अश्रुधूराच्या नळकांड्या फोडणारा एक गन मॅन होता. त्या तरुण जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मी त्यांना मोजक्या शब्दांत म्हणालो.
‘अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे…तुम्ही शूर आहात… मात्र, याक्षणी तुमचे मनोबल ढळू देऊ नका. आपण हाडामासांचे पोलीस आहोत… शिवाजी महाराजांच्या मावळ्यांप्रमाणे ही खिंड लढवू या.’
‘यस् सर…’ सगळ्या जवानांचे खणखणीत उत्तर.

ते खणखणीत उत्तर ऐकून मला स्फुरण चढले. अतिरेक्यांची कोंडी करण्यासाठी मी ताबडतोब नरिमन हाऊसच्या आजूबाजूला असणाऱ्या मेहता हाऊस, कस्तुरी हाऊस, प्रेमकोट, प्रदीप हाऊस, राजीव अपार्टमेंट, आयोनिक पार्क, कोळ्याची बिल्डिंग अशा सगळ्या इमारतीच्या गच्चीवर तर कोणाच्या घराच्या खिडकीत अशा ठिकाणी सगळ्या एसआरपी जवानांना पोझिशन्स दिल्या. त्यानंतर नरिमन हाऊसच्या पुढचे गेट तसेच मागील बाजू या ठिकाणी रेतीच्या गोणी भरून मोर्चेबांधणी केली. थोडक्यात नरिमन हाऊसमधून अतिरेक्यांना जेवढ्या पळण्याच्या वाटा होत्या, त्या मी सगळ्या रोखून धरल्या. त्यानंतर नरिमन हाऊसला वेढलेल्या माझ्या सगळ्या टीमला एक एक फैरी झाडायला सांगितले. या खेरीज नरिमन हाऊसच्या ज्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील खिडक्यांतून अतिरेकी गोळीबार करत होते, त्या खिडक्यांच्या दिशेने मी गनमॅनला अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडायला सांगितल्या. याचा परिणाम असा झाला की, अतिरेक्यांनी दुप्पट वेगाने आमच्यावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. आम्ही त्यांना कडवा जबाब देत होतो. तेवढ्यात नियंत्रण कक्षाकडून आमच्या मदतीसाठी पाच कमांडोंची आणखी कुमक पाठवण्यात आली. त्यांना पाहून माझा हुरुप वाढला. आता त्यांनासुद्धा पोझिशन्स देत आम्ही नरिमन हाऊसमधून आग ओकणाऱ्या अतिरेक्यांना प्रत्युत्तर देऊ लागलो. रात्रीच्या भयाण काळोखात हे युद्ध सुरू होते. मात्र, असे असतानासुद्धा स्थानिक रहिवासी हे आम्हा पोलीसांना खाण्यापिण्यासाठी जेवढी शक्य होईल ती मदत करत होते. कोणी चहा, बिस्किटे देत होते तर गुजराती बांधव खाकरा आणून देत होते. अतिरेकी हल्ल्याला तोंड देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असणारा प्रत्येक जण हा पोलीस फोर्सला मदत करत होता.

तेवढ्यात मला एटीएसमध्ये कार्यरत असणाऱ्या रघुवंशी साहेबांचा फोन आला.
‘बागवान… किती अतिरेकी आहेत?’
‘सर… अंधारात नक्की किती आहेत त्याचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, मी नरिमन हाऊसच्या आसपासच्या गच्चीवर लावलेल्या टीमकडून दोन किंवा तीन अतिरेकी असण्याची शक्यता वर्तवली जातेय. खरा आकडा सकाळ उजाडल्यावर समजेल…पण सर, आपण फोन करण्याचे कारण?’
यावर रघुवंशी साहेब म्हणाले,
‘बागवान… नरिमन हाऊसमध्ये लपलेल्या अतिरेक्यांचे पाकिस्तानमध्ये असणाऱ्या हॅन्डलरशी बोलताना त्यांचे फोन आम्ही टॅप केलेत.’
‘सर… काय बोलत होते ते लोक?’
‘पुलिस ने हम लोग को चारों तरफ से घेर रखा है. भागने की उम्मीद बेकार है.’
असे सांगत रघुवंशी साहेबांनी मला विचारले.
‘अरे, त्या अतिरेक्यांच्या बाबतीत नक्की तू काय केलेस?’
‘सर… मला पाठवलेल्या फोर्सने मी त्या लोकांना बिल्डिंगमधून बाहेर पडताच येणार नाही. अशी फिल्डिंग लावलीय.’
‘बागवान… यू हॅव डन् अ‍ॅन एक्सलंट जॉब… बट् बी केअरफुल.’
‘यस सर… कोणताही निरपराध जीव मारला जाऊ नये, यासाठी मी आधीच तीनशेहून अधिक रहिवाश्यांना सुरक्षित हलवलेय. ‘
माझी आणि माझ्या टीमची प्रशंसा करत रघुवंशी साहेबांनी फोन ठेवला, तेव्हा रात्रीचे अडीच तीन वाजले होते. आमचा गोळीबार सुरूच होता. तेवढ्यात पुन्हा माझा फोन वाजला. मी नंबर पाहिला तर तो नंबर होता राज्याचे मंत्री अजित पवार साहेबांचा. मी फोन घेतला तसे अजितदादा म्हणाले,
‘बागवान… मी नांगरेपाटील यांना फोन लावला आहे; पंरतु ते उत्तर देत नाहीत. नांगरेपाटील साहेब हे ताजच्या कारवाईत अडकल्याचे मला कळले… तुमची काय पोझिशन आहे?’
‘सर… मीसुद्धा नरिमन हाऊसचे ऑपरेशन हॅन्डल करतोय.’
‘बागवान… मला तुमच्या परिस्थितीची कल्पना आहे… पण प्लीज् माझ्यासाठी एक काम करा.’
‘यस सर, बोला.’
‘बागवान, माझे मंत्रालयातील सहकारी आर. सी शहा आणि तांबोळी हे ओबेरॉयच्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात हॉटेलच्या कंम्पाउंड वॉलजवळ अडकलेले आहेत. त्यांची कसेही करून सुटका करा.’
‘सर… पण माझे ऑलरेडी ऑपरेशन सुरू आहे.’
‘काय वाटेल ते करा पण प्लीज् त्या दोघांना वाचवा.’ असे बोलत अजितदादांनी मला आर. सी. शहा यांचा मोबाईल नंबर दिला.

त्या परिस्थितीत मी पूर्वतयारी करून माझी क्वालिस गाडी काढली. माझे शिपाई मिल स्पेशल लोंढे, ऑपरेटर आमले, ऑर्डर्ली उत्तम पवार आणि ड़्रायव्हर जाधव यांच्यासह मी ओबेरॉय हॉटेल गाठले. तिकडेसुद्धा अतिरेक्यांचा हॉटेलमधून वरून गोळीबार सुरू होता. साखरभवन आणि ओबेरॉयच्या भिंतीलगत गाडी उभी करून गाडीच्या टपावर चढून आम्ही कंम्पाउंडमधून आर. सी. शहा आणि तांबोळी यांना सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झालो. त्यांना घेऊन आम्ही निघालो, तेव्हा रस्त्यात त्यांना मी त्यांच्यावर गुदरलेल्या या प्रसंगाबद्दल छेडले.

घडले असे होती की, २६-११च्या रात्री मंत्रालयातील कामे आटोपून थकलेले आर. पी. शहा आणि तांबोळी हे त्याच रात्रीची सोलापूरला जाण्याची रेल्वे पकडण्यासाठी सीएसटी रेल्वे स्टेशनवर पोहचले. रात्री दहाची गाडी होती, तेव्हा सडकून भूक लागल्याने ते दोघे रेल्वे कॅन्टीनमध्ये गेले. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. तेवढ्यात गोळीबाराचे आवाज ऐकू आले. सीएसटी रेल्वे स्टेशनवर एकच गदारोळ माजला. नक्की काय झाले हे त्या दोघांना कळले नाही. मात्र, काही तरी झालेय असा विचार करून ते दोघे रेल्वे कॅन्टीनच्या किचनच्या मागील दरवाजातून बाहेर पडले, तेव्हा मध्यरात्र झाल्याने आता हॉटेल ओबेरॉयमध्येच जेवण मिळेल असा विचार करून ते दोघे हॉटेल ओबेरॉय येथे जायला निघाले. काही मिनिटांत ते दोघे हॉटेल ओबेरॉयपाशी टॅक्सीतून उतरले. टॅक्सीवाला निघून गेला. त्या ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट होता. आता ते दोघे हॉटेल ओबेरॉयमध्ये शिरणार एवढ्यात तिकडे गोळीबार सुरू झाला. अशा तऱ्हेने आगीतून सुटून फोफाट्यात सापडलेल्या त्या दोघांची सुटका करून आम्ही त्यांना सुखरूपपणे गार्डन हॉटेलमध्ये नेऊन सोडले मग आम्ही पुन्हा नरिमन हाऊसच्या ऑपरेशनसाठी परतलो.

दिनांक २६-११-२००८ पहाटेचा साडेतीनचा सुमार… मुख्य रस्त्यावर माध्यम प्रतिनिधींसह पाच-सहाशेचा जनसमुदाय जमलेला होता… आम्ही नरिमन हाऊसला सगळ्या बाजूने घेरलेले होते…थाऽऽ ड्.. थाऽऽ ड्… गोळीबार करत अतिरेकी नरिमन हाऊसच्या तळमजल्यावर आले. आमच्या मोर्चेबांधणी केलेल्या टीमने गोळीचे उत्तर गोळीने देताच अतिरेकी पुन्हा बिल्डिंगमध्ये पळाले. पहाटे पाच वाजेपर्यंत अतिरेक्यांनी दोन ते तीन वेळा बिल्डिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्यांना यश मिळू दिले नाही.

साधारण साडेतीनच्या सुमारास जॉर्इंट सीपी भगवंतराव मोरे साहेब आले. त्यानंतर काही वेळाने अ‍ॅडिशनल सीपी पवार साहेब आले. मी योग्य पाऊल उचलल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी मला आणि माझ्या टीमला शाबासकी दिली. शिवाय मला त्यांनी मार्गदर्शन आणि सूचना केल्या.

आम्ही पुन्हा नरिमन हाऊस भोवती दबा धरून बसलो. सकाळचे पाच वाजले होते. तेवढ्यात नरिमन हाऊसच्या गेटमधून एक नोकराणी एका लहान मुलाला खांद्यावर घेऊन बाहेर पडली. अतिरेक्यांच्या हा डाव असू शकतो अशी मला शंका आली. अत्यंत सावधपणे आम्ही त्या दोघांना ताब्यात घेतले. अत्यंत भेदरलेल्या त्या नोकराणीये नाव ‘सॅण्ड्रा’ आणि तिच्या सोबत असणाऱ्या ज्यू मुलाचे नाव ‘मोशे’ असल्याचे आम्हांला समजले. छोट्या ‘मोशे’च्या आई-वडिलांना आणि त्या इमारतीत रहाणाऱ्य़ा पाच ज्यू लोकांना अतिरेक्यांनी यमसदनास पाठवल्याचे सॅन्ड्राने सांगितले, तेव्हा आम्ही विलक्षण हळहळलो. (सॅन्ड्रा आणि मोशे यांना अतिरेक्यांनी जीवदान दिले. हा एक चमत्कार होता.) अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून आम्ही त्या दोघांना ताबडतोब कुलाबा पोलीस ठाण्यात हलवले.

आता अतिरेक्यांना धूळ चारलीच पाहिजे; असा विचार करून मी मारीया साहेबांना फोन केला. मी साहेबांना म्हणालो,
‘सर… नरिमन हाऊसच्या शेजारच्या बिल्डिंगच्या गच्चीतून लाकडी दरवाजा आडवा टाकून त्याचा पूल करून नरिमन हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावर जाण्याचा आमचा विचार आहे… सर… प्लीज आम्हाला ऑर्डर द्या.’
‘बागवान… बेटे तुम पागल हो गये हो क्या? … अरे बेटे… उनके पास ग्रेनेड है.’
‘सर, फिर हम लोगोंको ग्रेनेड दे दो’

माझ्या या उसळलेल्या वाक्यावर माझा स्वभाव ठाऊक असणारे मारिया साहेब मला म्हणाले, ‘बागवान… आर्मी से कुछ भी हथियार या बम हमें नहीं मिलते. और दुसरी बात यह है की, हम पुलिस अपना और लॉस सह नहीं सकते.’
‘सर… मैं समझा नहीं.’

माझ्या या प्रश्नावर २६-११च्या रात्री अतिरेक्यांशी मुकाबला करताना आमच्या खात्यातील एसटीएसचे करकरे साहेब, डीसीपी कामटे साहेब आणि पोलीस निरीक्षक साळसकर साहेब यांच्यासह बरेच अधिकारी, शिपाईगण धारातीर्थी पडल्याचे मला मारीया साहेबांकडून समजले. मला धक्का बसला; पण मारीया साहेबांनी खडसावत माझी समजूत काढली.

‘बागवान…जस्ट वेट. नॅशनल सिक्युरिटी गार्डला कॉल दिलेला आहे. ते येईपर्यंत तुम्ही मोर्चा सांभाळा.’ दिनांक २७-११-२००८. दुपारी चारच्या सुमारास एनएसजी चे सहा कमांडो आले. त्यांना त्यांच्या पोझिशन्स दिल्या. त्याच रात्री एनएसजी चे डीआयजी गुप्ता हे आणखी तीस कमांडोसह आले. त्यांना मी सगळ्या परिस्थितीची आणि घटनास्थळाची संपूर्ण माहिती दिली. त्यांनी फॅक्स मशीन तसेच सर्च लाईटची मागणी केली. त्या सुविधा त्यांना त्वरीत उपलब्ध करून दिल्या. त्या दरम्यान, नरिमन हाऊसच्या लगत असणाऱ्या मर्चंट हाऊस या बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या मर्चंट कुटुंबीयांना आम्ही बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. हे सगळं सुरू असताना अतिरेकी आमच्यावर गोळीबार करत होते. त्याला आम्हीसुद्धा गोळीबार करून प्रत्युत्तर देत होतो. अशा परिस्थितीत आर्मीचे जनरल थंबूराव आणि मेजर जनरल हुडा आले. आमचे वरिष्ठसुद्धा त्या ठिकाणी होते. उभय वरिष्ठांत पुढला प्लॅन ठरवला गेला. आता फक्त आजची रात्र आम्हांला नरिमन हाऊसमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना रोखून धरायचे होते.

दिनांक २८-११-२००८ चा दिवस उजाडला. सकाळी साडेसातच्या सुमारास नरिमन हाऊसच्या गच्चीवर हेलिकॉप्टरची घरघर सुरू झाली. बस्स्…. तो सिग्नल मिळताच ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आम्ही नरिमन हाऊसच्या दिशेने अश्रूधूराच्या नळकांड्या फोडत अतिरेक्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक हल्ला झाल्याने अतिरेक्यांची त्रेधातिरपिट उडाली. त्याच वेळेस सहा सहाच्या गटाने हेलिकॉप्टरमधून एनएसजीचे एकूण अठरा कमांडो नरिमन हाऊसच्या गच्चीत उतरले. गोळीबार करून अतिरेक्यांचे लक्ष विचलीत करण्याचा आमचा प्लॅन यशस्वी झाला होता. त्यानंतर काही मिनिटांत एनएसजीच्या कमांडोंच्या गोळ्यांनी नरिमन हाऊसमध्ये एकच दणदणाट केला. मात्र, त्यानंतर स्मशानशांतता निर्माण झाली.

उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसू लागला. तेवढ्यात काही एनएसजीच्या कमांडोंनी `मिशन सक्सेस’ चा सिग्नल दिला, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला तो शब्दात सांगणे कठीण आहे. मात्र, अजूनही मिशन पूर्णपणे संपलेले नव्हते. आम्ही ताबडतोब नरिमन हाऊसमध्ये गेलो. इमारतीत आम्हांला इम्रान आणि बाबर या अतिरेक्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्यापैकी एकाच्या हातात जिवंत बॉम्ब होता. त्याची काढलेली पिन त्याच्या मधल्या बोटात होती. पुन्हा तणाव निर्माण झाला. मात्र, तातडीने तो बॉम्ब आम्ही निकामी केला. या ऑपरेशनमध्ये गच्चीवर उतरून जिन्याने खाली उतरत टीमचे नेतृत्व करणारा एनएसजीचा कमांडो गजेंद्रिंसह हा अतिरेक्यांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडला होता. त्याचा मृतदेह आम्ही पोस्टमार्टेमसाठी पाठवण्याची तजवीज केली. अतिरेक्यांनी मारलेले ज्यू धर्मीय तीन पुरुष आणि दोन महिलांचे मृतदेहही आम्ही पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले. छिन्नविछीन्न झालेल्या नरिमन हाऊसच्या इमारतीत आम्हांला ३ एके ४७ च्या रायफली, त्याची ३८ जिवंत काडतुसे, नऊ रिकामी मॅक्झीन्स्, दोन माऊझर मॅग्झीनसह दोन पिस्तुले आणि त्याचे १४ जिवंत राऊंड या खेरीज भारतीय चलनाच्या पाच नोटा, मोबाईल्स अशा अनेक गोष्टी सापडल्या. अशा रीतीने दि. २६-११ च्या रात्री सुरू झालेले महासंहारक ऑपरेशन दि. २९-११ च्या संध्याकाळी संपुष्टात आले.

या घटनेत पोलीसांना यश मिळाले. मात्र, सर्वश्री पुरन जोशी, रमेश जोशी, राजू केतकर, संजय भसाणे, सुधीर गायकवाड, हरिश्चंद्र आव्हाड, रॉनी परेरा, विजय सुर्वे, कमलिंसह, महम्मद सलीम, महम्मद शकील रेहमान खान, गजानन शिंदे, राकेश कनोजिया, हनिफ शेख, श्रीपाद हाटे आणि हॉटेल कैलास पर्वत या स्थानिकांचा त्यात सिंहाचा वाटा होता. या कुलाबावासियांचा माझ्यावर विश्वास असल्याने या हल्ल्याच्या वेळेस मी सांगेन ती कामे हे लोक ऐकत होते. या लोकांच्या मदतीमुळे मी सुमारे तीनशे-साडेतीनशे लोकांना सुरक्षितस्थळी हलवू शकलो. त्यांनी केलेल्या मदतीला तोड नाही. त्यांच्या शौर्याचे वर्णन शब्दांत करता येणे शक्य नाही. त्यांच्या व्यतिरिक्त हे मिशन यशस्वी झालेच नसते.

दि. 26-11 च्या घटनेत अवघ्या दहा अतिरेक्यांनी जवळपास चार-पाच दिवस मुंबईला वेठीस धरलेले होते. पंचतारांकित हॉटेल्स तसेच दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करून अतिरेक्यांनी 185 निरपराध लोकांचा रक्तपात घडवून आणला होता. बरेच वरिष्ठ पोलीस अधिकारी, अंमलदार, शिपाई, जवान हे या हल्ल्यात शहीद झाले होते. या घटनेची सगळ्या माध्यमांनी आणि विरोधी पक्षाने गंभीर दखल घेतली. त्यामुळे त्या वेळचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबानी सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सरकारतर्फे निवृत्त प्रमुख सचिव प्रधान साहेब आणि निवृत्त महासंचालक बालचंद्र साहेब यांची कमिटी नेमली. या कमिटीने अतिरेक्यांनी ज्या ज्या ठिकाणी हल्ले केले होते. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन घटनेत वाचलेले, तसेच स्थानिक रहिवासी अशा साक्षीदांराकडून संपूर्ण खडन्खडा माहिती घेतली. या कमिटीने बारीक बारीक तपशीलात शिरून सगळ्या गोष्टींचा शोध घेऊन या घटनेत पोलीसयंत्रणा का आणि कुठे कमी पडली? याचे विवेचन सरकारपुढे मांडले. या प्रधान कमिटीने त्यांच्या रिपोर्टमध्ये माझा गौरव केला. हे माझे भाग्य समजतो. (प्रधान कमिटीच्या रिपोर्टचे मूळ कात्रण पुस्तकाच्या शेवटी इंग्रजीत छापले आहे.)
दि. 26 – 11 च्या घटनेनंतर माझ्या निवृत्तीचा दिवस जवळ येत होता. याच दरम्यान पोलीसखात्यातील माझ्या कामाची पोचपावती म्हणून माझ्यासमोर आणखी दोन वर्षं पोलीससेवा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारतर्फे ठेवण्यात आला. मात्र, मी तो नम्रपणे नाकारला. (खात्यातली ही दुर्मीळ घटना आहे.)

त्यानंतर दि. 31 मे 2009 रोजी मी निवृत्त झालो. गेली 35 वर्षे सतत चोवीस तास खाकी वर्दीशी जोडलेली नाळ अचानक तुटली. खाकी वर्दीशिवाय जगण्याची कल्पनाच मी करू शकत नव्हतो. मन सुन्न झाले. आयुष्यात एक विलक्षण मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मला सतत जाणवू लागले. मात्र, वर्दीशिवाय जगण्याचे सत्य मी स्वीकारले आणि माझ्या नव्या व्यवसायात मन गुंतवले.

मात्र, वाचकहो, योगायोग बघा. पुन्हा एकदा खाकी वर्दी दिमाखाने चढवण्याची संधी मला मिळाली. तो सुवर्ण दिवस होता दि. 26 जानेवारी 2010 हिंदुस्थानच्या ‘प्रजासत्ताक दिनी’ महाराष्ट्नाचे राज्यपाल माननीय श्री. शंकरानंद साहेबांच्या हस्ते राजभवन येथे मला दि. 26-11च्या धाडसी कारवाईबद्दल तिसऱ्या राष्ट्नपती शौर्यपदकाने सन्मानीत करण्यात आले. निवृत्त झाल्यानंतरसुद्धा पोलीस गणवेश चढवून शौर्यपदक स्वीकारण्याचा सर्वोच्च बहुमान मला या देशाने दिला. हे मी माझे परमभाग्य समजतो. माझ्या सेवेच्या काळात मी अगदी झोकून देऊन आणि माझ्या वर्दीचा मान राहील असे काम केले, याचा मला अभिमान आहेच. पोलीसदलाने मला खूप काही दिले. अनुभव, आव्हाने, स्वत:च्या शरीराला आणि बुद्धीला पणाला लावायची संधी, चांगले सहकारी, गुरूसमान वरिष्ठ, मानसन्मान आणि बरेच काही…. मी कृतज्ञ आहे.