
महापालिकेच्या 186 शाळांमध्ये राबवला जाणारा ‘सुरक्षित शाळा’ हा प्रकल्प राज्यातील खोके सरकारने बंद केल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संताप पसरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही जळजळीत प्रतिक्रिया दिली असून, राजकारणापायी लहान मुलांच्या आरोग्याशी तडजोड सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करीत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज बालदिन व जागतिक मधुमेह दिनी खोके सरकारने हा प्रकल्प बंद केल्याचे, मागे टाकल्याचे समजले. वाईट वाटले, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
हा प्रकल्प आम्ही बीएमसी सोबत मिळून सुरु केला होता, ज्यात नगर रचनाकारांच्या मार्गदर्शनातून 186 शाळा निवडल्या होत्या, ज्यात विशेष मुलांसाठीच्या 7 शाळा होत्या. शाळेच्या 500 मी.परिसरात मुलांच्या प्रवेश व निर्गमनाच्या जागेत अपघात व गुन्हे टाळण्यासाठी विशेष लक्ष दिले होते. शाळेत पोहोचल्यानंतर, मानसिक आरोग्य, दातांची तपासणी, मधुमेह तपासणी व व्यवस्थापन, डोळ्यांची तपासणी हे सारं होणार होतं, जे अचानक नगरविकास खाते व बीएमसीने थांबवलं, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
11 मे 2022 रोजी आम्ही या प्रकल्पाची सुरुवात केली, ज्यानंतर 186 शाळांवर नगर रचनाकारांनी काम केले. पण निविदा प्रक्रिया सुरु असतानाच काही जणांनी धोक्याने सरकार पाडले व नंतर नवीन घटनाबाह्य सरकार स्थापन केले. पण मुलांसाठीचे हे काम राजकारणापलिकडले असायला हवे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, गेल्यावर्षी तत्कालिन पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाचा शुभारंभ केला होता. सुरक्षित शाळा आणि दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे. वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे या उद्देशाने महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.
मुख्यमंत्र्यांना टोला
तत्कालीन नगरविकास मंत्र्यांना मुलांसाठी आवश्यक असा हा प्रकल्प राज्यभरातल्या शाळांमध्येही राबवला जावा अशी विनंतीही मी केली होती, पण खात्यातील इतर कामांच्या प्राथमिकतेपोटी हा प्रकल्प मागेच राहिला, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.





























































