‘बेस्ट’मध्ये मोठय़ाने बोलल्यास कारवाई, हेडफोन लावा, हळुवार बोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’मध्ये फोनवर मोठय़ाने बोलल्यास आता तुम्हाला कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. कारण फोनवर मोठमोठय़ाने बोलणाऱ्या प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे ‘बेस्ट’मध्ये मोठमोठय़ाने बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘बेस्ट’मध्ये यापुढे फोनवर बोलायचे असल्यास, गाणी ऐकायची असल्यास, ऑडिओ-व्हिडीओ पाहायचे असल्यास इअरफोन लावून ऐका, असे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

सध्याच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून वापरही बेसुमार वाढला आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी न घेता होणारा वापर इतरांसाठी खूपच त्रासदायक ठरत आहे. ‘बेस्ट’मध्ये याच विषयावरून अनेकदा भांडण आणि मारामारीचे प्रसंगही घडले आहेत. या सर्व प्रकाराचा सूज्ञ प्रवाशांना मात्र नाहक त्रास होतो. याबाबत ‘बेस्ट’ प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’ गाडय़ांमध्ये इअरपह्नशिवाय मोबाईलवर ऑडिओ, व्हिडीओ ऐकण्यास वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे.

अशी होणार कारवाई
प्रशासनाकडून याबाबत सूचना ‘बेस्ट’च्या मालकीच्या गाडय़ा आणि कंत्राटदाराकडून चालवण्यात येणाऱ्या गाडय़ांमध्ये परिपत्रक आणि सूचना ठळक अक्षरात लावण्यात येणार आहेत. याबाबत नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास प्रवाशांवर पोलीस कायद्यानुसार (कलम 38/112) कारवाई करण्यात येईल.