मध्य रेल्वेचे ‘प्लॅस्टिक द्या, मास्क घ्या’ अभियान, वर्ल्ड रिसायकलिन डे निमित्ताने उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने ‘वर्ल्ड रिसायकलिन डे’ च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत, ‘प्लॅस्टिक द्या, मास्क घ्या’ हे अनोखे अभियान छेडले आहे. या अभियानात प्रवाशांकडून प्लॅस्टिकच्या वस्तू जमा करण्यात येणार असून त्याबदल्यात त्यांना मास्क देण्यात येणार आहेत. याकरिता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर स्थानकात स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, (इंडिया), बृहन्मुंबई महानगरपालिका, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे हा उपक्रम महिनाभर राबविणार आहे. प्रवासी आपल्याकडील प्लॅस्टिक बॉटल, पॉलिथीन बॅग, स्ट्रॉ अशा स्टॉलवर देऊन त्या बदल्यात मास्क घेऊ शकणार आहेत. 18 मार्च हा ‘वर्ल्ड रिसायकलिन डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची यंदाची संकल्पना ‘रिसायकलिन हीरोज’ अशी आहे. आपले शहर स्वच्छ राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रवाशांकडून प्लॅस्टिकच्या टाकाऊ वस्तू गोळा करण्यामागे आपले शहर आणि स्थानक परिसर स्वच्छ राखण्याबरोबरच प्रत्येक प्रवाशांना कोरोना साथीच्या काळात कोविडचा प्रसार रोखण्यासाठी मास्क परिधान करणे कसे आवश्यक आहे, अशा चांगल्या सवयींविषयी जागरूक करण्याचा प्रयत्न यात असणार आहे.