मध्य रेल्वे दर आठवडय़ाला एक पूल पाडणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

सेफ्टी ऑडिटने धडधाकट ठरविलेला सीएसएमटी स्थानकालगतचा पूल अचानक कोसळल्याने धास्तावलेल्या मध्य रेल्वेने मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत धोकादायक ठरविलेले पाच पादचारी पूल पाडण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिलपर्यंत हे पाच धोकादायक पादचारी पूल पाडण्याचे टार्गेटही ठरविण्यात आले आहे. त्यामुळे दर आठवडय़ाला एक पादचारी पूल असे पाडकाम मध्य रेल्वेच्या इंजिनीयरिंग विभागाने हाती घेतले आहे.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागून असलेला ‘हिमालय’ पादचारी पूल गेल्या गुरुवारी अचानक कोसळल्याने सहा जणांचा बळी गेला होता. त्यानंतर आधीच सेफ्टी ऑडिट करण्यात आलेल्या पुलांच्या मजबूततेबद्दलही सर्वसामान्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांच्या शेजारील पुलांचेही सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे. तसेच ‘आयआयटी’ने अहवाल दिलेल्या पुलांचे पाडकाम तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

30 एप्रिलपर्यंत हे पाच पादचारी पूल पाडणार

मध्य रेल्वेच्या मार्गावरील भांडुप स्थानकातील कल्याण दिशेचा पादचारी पूल, दिवा स्थानकातील सीएसटी दिशेचा पादचारी पूल, विक्रोळीचा सीएसटी दिशेचा पूल, कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेचा पूल आणि कल्याण स्थानकातील पादचारी पूल असे पाच पादचारी पूल जुने झाले असून त्यांना पाडण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच टेंडर प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या पुलांपैकी काही पादचारी पूल यापूर्वीच बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या जुन्या पुलांच्या पाडकामामुळे प्रवाशांना काही त्रास होणार नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

…तर भायखळय़ाचा उड्डाणपूल अवजड वाहनासाठी बंद

भायखळा खडा पारसी येथील उड्डाणपूल अवजड वाहनांकरिता बंद करण्याचा आयआयटीचा प्रस्ताव आहे, परंतु आयआयटीचा अंतिम अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे आयआयटीने अद्याप त्यावर लेखी अहवाल दिलेला नसल्याने याबाबत अनिश्चितता आहे. हा पुल वाहतूकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हँकॉक पूल पाडल्यानंतर तसेच मेट्रोच्या कामांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत असताना हा पूल अवजड वाहनांसाठी कसा बंद करायचा हा पेच निर्माण झाला आहे.

करी रोड पुलाच्या पादचारी मार्गिकेला दुरुस्तीची गरज

करी रोड रेल्वे स्थानकात येथे उड्डाणपुलाच्या पादचारी मार्गिकेची दुरुस्ती करावयाची आहे. परंतु येथे रेल्वे प्रवाशांना जाण्यासाठी रस्त्याच्या काही भागावर बॅरिकेडस् टाकून जागा तयार करावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूक विभागाला पत्र लिहिले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.