Mumbai crime news – सवा कोटीचे दागिने घेऊन नोकर पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोन्याच्या दुकानामध्ये काम करणाऱ्या नोकराने त्याच्या साथीदाराच्या मदतीने 1 कोटी 30 लाखांचे दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी तीनजणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे सोने व्यावसायिक असून मालाड येथे सोन्याचे दुकान आहे. गेल्या आठवडय़ात ते देवदर्शनासाठी राजस्थान येथे जाणार होते. त्यामुळे त्यांनी दुकानाची चावी एका नोकराला दिली. दिलेल्या पाच चाव्यांपैकी एकाही चावीने दुकान उघडत नसल्याचे एका नोकराने त्यांना सांगितले. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्या मेहुण्याला फोन करून दुकानात जाण्यास सांगितले. त्यांनीही चावीने दुकान उघडत नसल्याचे त्यांना सांगितले. तक्रारदार लागलीच मुंबईत परतले आणि चाव्यांची तपासणी केली असता चाव्या दुकानाच्या नसल्याचे समोर आले. कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला असता 1 कोटी 30 लाखांचे सोन्याचे, चांदीचे दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.