
बीडहून मुंबईकडे जाणाऱ्या चार चाकी गाडीला भीषण अपघात झाला आहे. चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडावर गाडी आदळली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील निंबोडी या गावाजवळ हा अपघात झाला. या प्रकारणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गाडी चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातामध्ये चालकाची पत्नी विनिता दीपक उघडे (26) व मुलगी रास्वी दीपक उघडे वय दीड वर्ष राहणार मुलुंड मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दीपक उघडे राहणार मुलुंड मुंबई , प्रथमेश कनोजिया यांची पत्नी व एक मुलगी जखमी झाले आहेत.
दीपक उघडे हे कुटुंबासह बीड येथून मुंबईकडे जात होते. नगर तालुक्यातील निंबोडी या गावात आल्यावर त्यांच्या ताब्यातील रेनॉल्ट क्विड कंपनीची गाडी नंबर एम एच 04 एच एम 7392 ही बीड ते मुंबई अशी घेऊन जात असताना गाडीवरचा ताबा सुटून गाडी लिंबाच्या झाडाला जाऊन आदळली. हा अपघात एवढा मोठा होता की आजूबाजूचे नागरिक तात्काळ या ठिकाणी जमा झाले. मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या या ठिकाणी थांबल्या होत्या.
या घटनेची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना कळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख हे तात्काळ अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर नातेवाईक नगरच्या दिशेने निघाले आहेत. तर दुसरीकडे जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून यातील एकाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
याप्रकरणी अमोल नवनाथ आव्हाड वय -37 धंदा, नोकरी नेमणूक भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक सुधाकर उघडे 30 वर्षे राहणार मुलुंड ईस्ट म्हाडा कॉलनी हरिओम नगर जिल्हा ठाणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































