हॉलीवूड स्टुडिओच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रनगरीचा विकास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

हॉलीवूडनंतर जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीचा अविभाज्य घटक असलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचा संपूर्ण कायापालट करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. भव्य बॉलीवूड म्युझियम, लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवर वॅक्स म्युझियम, चित्रपटसृष्टीवर आधारित लेझर शो, साऊड अँड लाईट शो, मराठी संस्कृती संग्रहालय, बच्चे कंपनीसाठी थीम पार्क आणि देशविदेशातून येणाऱ्या चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी हॉटेल अशा प्रकारे अमेरिकेच्या जगविख्यात हॉलीवूड स्टुडिओच्या धर्तीवर तब्बल 2 हजार 550 कोटी रुपये खर्च करून गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचा विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.

गोरेगावच्या तब्बल 521 एकरच्या जागेवर वसलेल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीचा (फिल्मसिटी) विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. बांधा वापरा व हस्तांतरित करा(बीओटी) तत्त्वावर या चित्रनगरीचा विकास होणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी फार कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला नाही पण आता रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स एंटरटेनमेंट व भानोट इन्फ्राव्हेंचर्स या तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे अशी माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा यांनी दिली.

70 कोटींचे उत्पन्न

गोरेगावच्या या विशाल जागेवर 1977मध्ये चित्रपट नगरीची स्थापना झाली. प्रारंभी चार स्टुडिओपासून सुरुवात झाली. टप्प्याटप्प्याने आजच्या घडीला पंधरा इनडोअर व अनेक आऊट डोअर स्टुडिओ आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा, ये रिश्ता क्या कहेलाता है, कौन बनेगा करोडपती. रिऑलिटी शो, हिंदी, मराठी बिग बॉस अशा असंख्य लोकप्रिय मालिकांचे तर त्रिशूलपासून जोधा अकबरपासून सध्याच्या भारत चित्रपटांचे शूटिंग या नगरीत झाले आहे. या चित्रपटनगरीतून वार्षिक 70 कोटी रुपयांचे उत्पन्न सरकारला मिळते. आता या नगरीला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. या चित्रपट नगरीच्या विकासासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतात अशी माहिती अमरजित मिश्रा यांनी दिली. नव्याने आखलेल्या प्रकल्पाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

लंडनच्या धर्तीवर वॅक्स म्युझियम

हिंदुस्थानातीलकानाकोपऱ्यातील संस्कृतीपासून परदेशातील काँन्टीनेंटल फूडपर्यंतच्या सर्वसुविधा पुरवल्या जातील. भेटवस्तूंची दालने असतील. व्हिंटेज कारची सफर करता येईल. भव्य बॉलीवूड म्युझियम उभारण्यात येत आहे.

बच्चे कंपनीसाठी थीम पार्क

बच्चेकंपनीसाठी थीम पार्क खास आकर्षण असेल. त्यात हवेत उडणारा क्रीश, सुपरमॅन, स्पायडरमॅन, अक्राळविक्राळ ड्रगन्स असतील.

परवडणारी हॉटेल

या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना परवडतील अशी हॉटेल, डाँर्मेटरीज तसेच थ्री स्टार व फाईव्ह स्टार हॉटेल असतील. कान्स, ऑस्करच्या धर्तीवर हिंदुस्थानातील पुरस्कार वितरण सोहळे, महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार वितरण सोहळे होतील.

पाच वर्षात विकास

या प्रकल्पाच्या उभारणीचे प्रत्यक्षात टेंडर निश्चित झाल्यापासून पाच वर्षांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण होईल अशी योजना आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख

भव्य बॉलीवूड म्युझियम उभारण्याची योजना आहे. रसिकांना 100 वर्षांचा हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचा इतिहास रंजक पद्धतीने पाहता येईल. या म्युझियमचे खास आकर्षण म्हणजे लंडनच्या मादाम तुसाँच्या धर्तीवर वॅक्स म्युझियम, स्टंट सीनचे थिएटर, चित्रपटसृष्टीच्या विविध विषयांवरचे लेझर शो, साऊंड अँड लाईट शो येथे होतील.

पर्यटकांना महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी मराठी संस्कृती संग्रहालय उभारण्यात येणार आहे. मराठी तसेच अन्य भाषांतील चित्रपटांसाठी दोन वेगळे स्टुडिओ असतील. प्रेक्षकांसाठी व्हुइंग गॅलरी असेल. जुनी मुंबई, नवी मुंबई, मध्य मुंबई दाखवणारे देखावे असतील.