प्रचार सभांच्या ‘विराट’ दर्शनासाठी ‘ड्रोन’चा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचार सभांना आता वेग येऊ लागला आहे. या प्रचारसभांचे आकाशातून कव्हरेज करण्यासाठी सध्या ड्रोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष स्वतःच्या ‘विराट’ सभांचे दर्शन घडवण्यासाठी सर्रास ड्रोनचा वापर करू लागले आहेत. मुंबईत ड्रोन्स पुरवणाऱया कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांकडे ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्यासाठी परवानगी अर्जांची संख्याही वाढत आहे. मुंबईत शेवटच्या टप्प्यात प्रचारसभा व मतदान होणार असल्याने प्रचारसभांना वेग आलेला नाही. पण या प्रचारसभांचे आकाशातून शूटिंग करण्यासाठी ड्रोन्सची मागणी वाढत आहे असे मुंबईतील झेन व्हिडीओचे मिलिंद सबनीस यांनी सांगितले.

राजकीय सभांमध्ये मागणी

खासगी कार्यक्रमांचे ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग करण्यासाठी पोलिस काटेकोर तपासणी करतात. पण राजकीय सभांना परवानगी देताना पोलीस फार आढेवेढे घेत नाहीत. हल्ली बहुतांश राजकीय पक्ष राजकीय प्रचारांच्या सभांच्या कव्हरेजसाठी ड्रोन्सचा सर्रास वापर करतात. कँमे-यांच्या जोडीला ड्रोनची जोड देऊन थेट प्रक्षेपणासाठी वापर होत आहे.

सुरक्षेसाठी होती बंदी

मुंबईत सुरक्षेच्या कारणामुळे ड्रोन्सवर बंदी घातली होती. मध्यंतरी मुंबई विमानतळाच्या परिसरात ड्रोन घिरटया घालताना दिसल्याची चर्चा होती. देशाच्या काही महत्वाच्या स्थळांवर हवाई हल्ल्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उंचीवर मर्यादा

100 मीटर उंचीपेक्षा अधिक उंचीवर ड्रोनचे उड्डाण करण्यावर निर्बंध आहेत. त्यापेक्षा अधिक उंचीवर ड्रोनचे उड्डाण केल्यास कारवाई होऊ शकते.
मुंबईत ड्रोनच्या मदतीने शूटींग करणाऱया किमान पन्नास कंपन्या असतील असा प्राथमिक अंदाज आहे.
फँटम कंपनी ड्रोनच्या उत्पादनात आघाडीवर आहे.
सध्याच्या घडीला एका सभेसाठी सुमारे बारा ते चौदा हजार रुपये आकारले जातात. ड्रोनवरचा कॅमेरा जेवढा चांगला तेवढे भाडे अधिक असते.

ड्रोनच्या शूटींगचा उपयोग घातपाती कारवायांसाठी होणार नाही तसेच ड्रोन चित्रिकरणाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवणार नाही याची जबाबदारी ड्रोन पुरवणाऱया कंपनीवर असते.
ड्रोनच्या माध्यमातून होणाऱया शूटींगची परवानगी पोलिस मुख्यालयातून घ्यावी लागते तसेच स्थानिक पोलिसांनाही त्याची माहिती द्यावी लागते.