फोर्ट, ग्रॅण्ट रोड, अंधेरी, वांद्रय़ात सर्वाधिक रुग्ण; उच्चभ्रू वस्त्यांमधील वाढत्या कोरोनामुळे टेन्शन

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत तब्बल 90 टक्के रुग्ण उच्च्चभ्रू वस्ती-इमारतींमधील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये ए विभाग कुलाबा-फोर्ट, डी विभाग ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्र पूर्व-पश्चिममध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत आहे. 100 पर्यंतखाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट तीन हजारांवर गेल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. मात्र या रुग्णंख्येत झोपडपट्टीपेक्षा इमारतींमधील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परदेशातून आल्यानंतर विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांमध्ये हे प्रवासी बाधित असल्याचे स्पष्ट होत नसले तरी काही दिवसांनी हेच प्रवासी बाधित होत आहेत. या काळात संबंधित प्रवाशांचा कुटुंबासह अनेकांशी संपर्क  येत असल्यामुळे, मीटिंग-कार्यक्रमांना हजेरी लावली जात असल्यामुळेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना वेगाने पैलावत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

दहा दिवसांत सक्रिय रुग्णसंख्येत पाचपट वाढ

  • के पश्चिम अंधेरी पश्चिम विभागात 19 डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 277 होती. या विभागात 31 डिसेंबर रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 1440 वर पोहोचली आहे. के पूर्व अंधेरी पूर्व विभागात 19 डिसेंबर रोजी 159 असणारी रुग्णसंख्या 31 डिसेंबर रोजी 756 वर पोहोचली आहे.
  • वांद्रे पूर्व विभागात 60 असणारी सक्रिय रुग्णसंख्या 31 डिसेंबर रोजी 512 वर पोहोचली आहे. तर वांद्रे पश्चिम विभागात सक्रिय रुग्णांची संख्या 149 वरून 1085 वर पोहोचली आहे.
  • डी विभाग ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसरातही रुग्णवाढ कायम असून या ठिकाणी 136 असणारी सक्रिय रुग्णांची संख्या 31 डिसेंबर रोजी 958 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत 2081 वरून 11360 पोहोचली आहे.

अशी घ्या खबरदारी

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये येणारे घरकामगार, ड्रायव्हर, वॉचमन आदींची आवश्यतेनुसार कोरोना चाचणी करून घ्यावी आणि बाधितांना क्वारंटाइन करावे. संबंधितांसाठी असणाऱ्या स्वच्छतागृहांचे दिवसातून चार ते पाच वेळा सॅनिटायझेशन करावे, गर्दीच्या सोहळ्यांचे आयोजन करू नये, परदेशातून आलेल्यांनी सात दिवस सक्तीने आणि काटेकोरपणे क्वारंटाइन पाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.