कुरारगाव, साकीनाक्यात दरड कोसळली; 350 रहिवाशांचे मालाडमध्ये सुरक्षित स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सोमवारी रात्री कुर्ला येथे दरड कोसळून एक जण किरकोळ जखमी झाला तर आज सकाळी 10.30 च्या सुमारास कुरार गावातील आंबेडकर नगरमध्ये दरडीचा काही भाग कोसळला. यात कोणीही जखमी झाले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून येथील 350 रहिवाशांना पालिकेच्या शाळेमध्ये तात्पुरते हलवण्यात आले आहे.

मुंबईत सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे कुर्ला साकीनाका येथील जीएमएम रोडवरील तबेला येथे रात्री 11 च्या सुमारास दरड कोसळली. ही दरड सार्वजनिक शौचालयाजवळ असलेल्या गाळ्यावर कोसळली. यात जिवाच्छा शहा (47) हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली तर आज सकाळी 10.30 वाजता मालाड कुरार गावातील आंबेडकर नगरात दरडीचा काही भाग घरांवर कोसळला. यात कोणीही जखमी झाले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून येथील 350 रहिवाशांना पारेखनगर येथील महापालिकेच्या शाळेत हलवण्यात आले आहे. घटनास्थळी पालिका आणि वन विभागाच्या कर्मचाऱयांकडून कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

कुरारगावातील आंबेडकर नगरमध्ये पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील 100 रहिवाशांना पालिकेने तात्पुरत्या निवाऱयासाठी शाळेत हलवले आहे. हा भाग वन विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. – मकरंद दगडखैर, सहाय्यक आयुक्त, पी-उत्तर