
विकासकाने सदनिकेचा ताबा घर खरेदीदारास हस्तांतरित करण्यास नकार दिल्याबद्दल येथील न्यायालयाने दोन विकासकांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.बी. गुराव यांनी केडी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित रूपारेल आणि परीक्षित शर्मा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
आरोपी रूपारेल ओरियन हे चेंबूरमध्ये निवासी टॉवर बांधत होते. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार त्याने इमारतीत फ्लॅट 34 लाख रुपये देऊन बुक केला होता. मात्र तो वेळेत न दिल्याने बुकिंगची रक्कम व्याजासह परत करणे अपेक्षित होते, मात्र ती परत न मिळाल्याने तक्रारदाराने दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. याबाबत न्यायालयाने आरोपींविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे मानत हा गुन्हा गंभीर असल्याचे म्हटले. शिवाय तक्रारदार आणि इतरांनी लाखो रुपये या प्रकल्पात गुंतवले आहेत. त्यामुळे आरोपींची कोठडीत चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने याचिका फेटाळली.

























































