पोयसर नदी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये घरे, 11 रहिवाशांचे स्थलांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली पश्चिमच्या महत्त्वाच्या पोयसर नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामातील प्रकल्पग्रस्तांना माहुलमध्ये घरे देण्यात येणार आहेत. या परिसरातील 30 पैकी 11 कुटुंबीयांचे माहुलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कांदिवली पूर्वेकडील प्रकल्पग्रस्तांसाठी 200 घरे देण्याची मागणी पालिकेने ‘एसआरए’कडे केली आहे.

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उगम पावणारी पोयसर नदी महत्त्वपूर्ण नदी आहे. ही नदी पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पश्चिम रेल्वे ओलांडून पुढे मालाड खाडीमध्ये विसर्जित होते. गेल्या काही वर्षांपासून या नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प प्रलंबित आहे. या नदीत विविध पर्जन्य जलवाहिन्यांमधून परिसरांतील वसाहती, झोपडपट्टय़ा व सोसायटय़ांमधील मलमिश्रीत सांडपाणी सोडले जाते. शिवाय नदीच्या काठांवर असलेल्या तबेल्यांमधून पाणी, घाण प्रक्रियेविना सोडली जाते. या पार्श्वभूमीवर पालिकेने या नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. सद्यस्थितीत पोयसर नदीच्या पश्चिमेकडील भागात संरक्षक भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात परिसरातील झोपडय़ा व सोसायटय़ांमध्ये पाणी साचण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.

असे होणार काम

नदी कायम शुद्धी ठेवण्यासाठी नदीच्या परिसरात सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार असून दररोज 33.5 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.

दोन्ही काठांवर सेवा रस्ता आणि रस्त्यालगत पर्जन्य जलवाहिन्या बांधल्या जाणार आहेत. या कामासाठी पालिका तब्बल 1482 कोटी रुपये खर्च करणार आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नदी परिसरातील रहिवशांचे स्थलांतर करण्यात येत आहे. सध्या 11 कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले असून इतरांना पात्रता सिद्ध झाल्यानंतर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.