
सामना प्रतिनिधी, मुंबई
नैराश्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱया ब्रिटिश नागरिकाचे पवई पोलिसांनी प्राण वाचवले आहे. सॅम कॉलर्ड असे त्याचे नाव आहे. ब्रिटिश हाय कमिशनने पवई पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.
सॅम हा अंधेरी येथील अमेरिकन कंपनीमध्ये कामाला आहे. तो पवईच्या अवलोन इमारतीत राहतो, तर त्याची पत्नी ऑस्ट्रेलियामध्ये राहते. आठ महिन्यांपूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर तो नैराश्यात गेला होता. गेल्या आठवडय़ात सॅमने पत्नीला फोन करून मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. तिने याची माहिती ब्रिटिश हाय कमिशनला देताच त्यांनी पवई पोलिसांना कळविले. त्यानंतर काही क्षणांत सहायक आयुक्त मिलिंद खेतले, पोलीस निरीक्षक अनघा सातवसे, बळवंत देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाघ, पोलीस शिपाई राम हांडे, नवनाथ जावळे आदींचे पथक अवलोन इमारतीत गेले तेव्हा सॅमने रूम आतून बंद केला होता. पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नानंतर दरवाजा उघडून सॅमची समजूत काढली. त्यानंतर तो पोलीस वाहनातून रुग्णालयात जाण्यास तयार झाला. याची माहिती समजताच ब्रिटिश हाय कमिशनच्या अधिकाऱ्यांनी पवई येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन सॅमची विचारपूस केली.


























































