
मुंबईच्या क्रिकेट संघाने उपांत्य सामन्यात धडक मारली, ही गोष्ट आनंदाची आहे की दुःखाची? असा प्रश्न मुंबईकर क्रिकेटप्रेमींना पडलाय. कारण गेली आठ वर्षे जेतेपदापासून दूर असलेला हिंदुस्थानी क्रिकेटचा सम्राट मुंबईचा संघ आपल्या घरच्या मैदानात तामीळनाडूविरुद्ध उपांत्य फेरीचा खेळणार आहे, पण हा सामना हक्काच्या वानखेडे स्टेडियमवर न खेळवता बीकेसीतल्या आसनव्यवस्था नसलेल्या मैदानावर खेळविला जाणार आहे. इतका मोठा सामना वानखेडेवर का खेळवला नाही, असा संतप्त सवाल मुंबईकर क्रिकेटप्रेमींनी मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) केला आहे.
मुंबईकरांचे क्रिकेटप्रेम जगप्रसिद्ध आहे. ते प्रेम आजही कायम आहे. टी-20 च्या जमान्यातही रणजी सामन्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आजही हजारो प्रेक्षक वानखेडेवर गर्दी करतात. असे असतानाही सामान्य प्रेक्षकांची फारशी सोय नसलेल्या बीकेसी ग्राऊंडवर सामना खेळवला जात आहे. या ग्राऊंडवर सामान्य प्रेक्षकांची कसलीही सोय नसली तरी उपांत्य सामन्यासाठी 300 प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे एमसीएच्या सूत्रांकडून कळले आहे.
रणजी सामन्यांना दुय्यम वागणूक का?
हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसाठी रणजी तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक आहे. मग रणजीचा उपांत्य सामना वानखेडे स्टेडियमवर न खेळवता बीकेसीतल्या क्लब क्रिकेट ग्राऊंडवर खेळवणे, ही दुर्दैवाची बाब आहे. वानखेडेवर आयपीएलचे सामने होणार आहेत म्हणून रणजी सामन्यांना ही दुय्यम वागणूक दिली गेली आहे का? यजमान संघाला आपल्या घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांचा पाठिंबा लागत नाही का? बीकेसीत क्रिकेट पाहायला कुणी जातं का? असे अनेक प्रश्न मुंबईकर क्रिकेटप्रेमींना पडलेत.
फक्त 300 प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था
मुंबईला उत्साह वाढवण्यासाठी दर्दी मुंबईकर क्रिकेटप्रेमी बीकेसी गाठण्याची दाट शक्यता आहे. एमसीएने मैदानात 300 प्रेक्षकांची बसण्याची, पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच तात्पुरत्या शौचालयही ठेवले आहे. मात्र हा सामना पाहायला हजारोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी बीकेसी गाठले तर त्यांना निराश होऊ देणार नसल्याची माहिती एमसीएच्या सूत्रांनी दिली आहे. गरज भासल्यास किमान दोन हजार प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याची तयारी एमसीएने केली आहे. मात्र त्यापेक्षा अधिक गर्दी उसळली तर प्रेक्षकांना घरी पाठवणार की सामना पाहायला देणार, याचे उत्तर मात्र एमसीएकडे नव्हते.
…की मुंबई संघालाच वानखेडेची भीती ?
उपांत्य सामना वानखेडेवरच व्हायला हवा होता आणि तो पूर्णपणे तयारही आहे. मात्र यंदाच्या मोसमात उत्तर प्रदेशविरुद्धचा एकच सामना वानखेडेवर झाला आणि त्याच सामन्यात मुंबईला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर यंदा मुंबईने एकच सामना गमावला असून तोसुद्धा वानखेडेवरच. दुसरीकडे बीकेसीवर झालेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत मोठे विजय तर बडोद्याविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे मुंबई संघालाच वानखेडेवर पराभवाची भीती वाटतेय की काय? अशी शंका येऊ लागली आहे.

























































