
देशातील एकमेव पेंग्विन सफारीला मुंबई-महाराष्ट्रासह देशविदेशातील पर्यटकांची मोठी पसंती मिळत असल्याने पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न तीन वर्षांत तब्बल सहा पटींनी वाढले आहे. पेंग्विन आणण्याआधी एप्रिल 2014 ते मार्च 2017 या कालावधीत केवळ 2.10 कोटी इतके उत्पन्न होते. मात्र पेंग्विन आल्यानंतर एप्रिल 2017 ते मार्च 2020 या कालावधीत उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे उत्पन्न 14.36 कोटीवर पोहोचले आहे. म्हणजेच तीन वर्षांत उत्पन्नात 12.26 कोटींची सहा पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी 11.46 कोटींचा खर्च झाला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली.
राणीच्या बागेत दररोज पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार, सुट्टीच्या दिवशी येणाऱया पर्यटकांची संख्या 15 हजारांवर जाते. पेंग्विन आणल्यानंतर येणाऱया पर्यटकांची संख्या वाढली असून उत्पन्नातही वाढ झाल्याची माहिती संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
आता देखभालीचा खर्चही वाचवणार
या ठिकाणी आता 3 नर आणि 4 माद्या पेंग्विन आहेत. पेंग्विन आणल्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी 11 कोटी 46 लाखांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. तर आता सप्टेंबरमध्ये या टेंडरची मुदत संपल्याने 15 कोटी 26 लाखांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यामध्ये तीन वर्षांची 10 टक्के वाढीव खर्चाची तरतूदही गृहीत धरण्यात आली होती. मात्र या खर्चामध्येही आता कपात करून काही कामे पालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी सुधारित निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.





























































