लोकल वाढवा! खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या लोकलमधील गर्दीची गोष्ट डोंबिवलीच्या उल्लेखाशिवाय अशक्यच. डोंबिवलीला जाणारी किंवा तिथून येणारी कोणतीही लोकल कधीच खच्चून भरल्याशिवाय येत-जात नाही. हजारो प्रवासी कल्याणवरूनच गाडीत बसून येतात. आणि मग डोंबिवली स्थानकात वाट पाहणाऱया प्रवाशांना त्रागा करत नाइलाजास्तव उभ्याने प्रवास करावा लागतो. याबाबत आवाज उठवूनही रेल्वे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अखेर डोंबिवलीकरांचा हा आवाज मंगळवारी थेट लोकसभेत पोहोचला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवली लोकल वाढवण्याची मागणी केली.

डोंबिवलीकर प्रवाशांचा गर्दीचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी नियम 377 अंतर्गत पत्राद्वारे उपस्थित केला. डोंबिवलीकर प्रवाशांना होणाऱया त्रासाची सविस्तर माहिती त्यांनी लोकसभेला दिली. डोंबिवलीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱया लोकल आहेत. पण त्या ‘डोंबिवली’ लोकल असूनही कल्याणहून सुटतात. डोंबिवलीला लोकल येईपर्यंत भरून जाते. डोंबिवलीतील प्रवाशांना बसायला जागाच उरत नाही. आधीच बसून आलेल्या प्रवाशांबरोबर डोंबिवलीकरांची भांडणे होण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत.

डोंबिवलीकर प्रवाशांनी त्यांना होणाऱया या त्रासाबद्दल रेल्वे अधिकाऱयांकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण काहीच कारवाई केली गेली नाही. डोंबिवली लोकलमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होते आणि लोकलही उशिराने धावतात, असे सुप्रिया सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे. डोंबिवलीतील प्रवाशांच्या समस्येबाबतचा हा मुद्दा शून्य प्रहरात चर्चेसाठी घेण्यात यावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरवरही दिली आहे.