बंगालमध्ये हत्या करून मुंबईत लपलेल्या दोघांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या केल्यानंतर मुंबईत येऊन लपलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट-9 ने पकडून हावडा गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले. ते दोघेही मुंबईबाहेर पळण्याच्या तयारीत होते पण ते सटकण्याआधीच दोघांवर झडप घालण्यात आली.

हावडा येथील कसाई मोहल्ल्यात मन्वर अली याची दिवसाढवळ्या दोघांनी निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर आरोपींनी हावडा सोडून मुंबई गाठली होती. त्यामुळे दोघांना पकडण्यासाठी हावडा गुन्हे शाखेचे पथक मुंबईत आले होते. त्यांना सहकार्य करून आरोपींना पकडण्याची जबाबदारी युनिट-9 ला देण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय इरफान शेख, उपनिरीक्षक वाल्मीक कोरे, अंमलदार जाधव, पेडणेकर, पाटील, नाईक, खरटमोल, पवार, झोडगे या पथकाने आरोपी अहमद अली अब्दुल कादिर ऊर्फ प्रेम (27) आणि हसन रमिझ सलामत अली ऊर्फ गुलझार अन्सारी (21) यांचा शोध सुरू केला. ते दोघे अंधेरीच्या आझाद नगर परिसरात लपून राहत असल्याची खबर मिळाल्यानंतर शेख व कोरे यांनी खबऱयांना कामाला लावले. दरम्यान, 7 मार्चच्या सायंकाळी आरोपी हावडा मेलने दुसरीकडे पळून जाणार असल्याची खबर कोरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सीएसएमटी स्थानकात सापळा लावून प्रेम आणि गुलझार या दोघांना पकडले. पुढील कारवाईसाठी दोघांनाही हावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.