अंतिम वर्षांच्या परीक्षा लटकण्याची शक्यता, मुंबई विद्यापीठात कर्मचाऱयांचे सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन

राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह इतर 10 प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱयांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. या मागणीसाठी आता मुंबई विद्यापीठात येत्या सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्मचारी संघटनांच्या या पवित्रामुळे मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा आणि निकालाच्या कामाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. यानंतरही सरकारकडून आश्वासनांशिवाय ठोस निर्णय घेण्यात येत नसल्याने राज्यभरातील विद्यापीठांमधील कर्मचाऱयांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

अन्यथा काम बंद आंदोलन

मुंबई विद्यापीठ शिक्षक, अधिकारी, कर्मचारी समन्वय समितीमार्फत 28 सप्टेंबरपासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही जर मागणी पूर्ण न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विद्यापीठ कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अभय राणे यांनी सांगितले.

परीक्षांना बसू शकतो फटका

कर्मचारी संघटनांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या होऊ घातलेल्या परीक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या