
शिक्षकेतर कर्मचाऱयांनी परीक्षा कामकाजावर टाकलेल्या बहिष्कारामुळे स्थगित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सोमवार, 6 फेब्रुवारीपासून आधीच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना हिवाळी सत्रातील परीक्षा सुरू करण्याच्या सूचना शनिवारी दिल्या.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱयांनी परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाने परस्पर परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याची उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गंभीर दखल घेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, अधिनियम 2016 मधील तरतुदींनुसार विहीत वेळेत परीक्षा पार पाडण्याची जबाबदारी विद्यापीठांची असून त्यादृष्टीने विद्यापीठाने आवश्यक ती उपाययोजना करून परीक्षा वेळेवर पार पाडण्याच्या सूचना दिल्या. यानंतर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने 6 फेब्रुवारीपासून परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होतील, अशा सूचना दिल्या
3 व 4 फेब्रुवारीच्या परीक्षांच्या तारखा लवकरच
शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या संपाचा फटका बसल्याने मुंबई विद्यापीठाच्या 3 व 4 फेब्रुवारीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. या स्थगित झालेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.
























































