
सामना प्रतिनिधी । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रात दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यांत 23 एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिह्यांत व सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात, तर 29 एप्रिल रोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिह्यांमध्ये निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 22,23 व 24 एप्रिल असे तीन दिवस तर दुसऱ्या टप्प्यांतील मतदानासाठी 29 व 30 एप्रिल असे एकूण पाच दिवसांचे विविध परीक्षांचे पेपर व वरील दिवशी सुरू होणाऱ्या काही परीक्षा विद्यापीठ पुढे ढकलणार आहे.
मुंबई विद्यापीठ कार्यक्षेत्रात 23 व 29 एप्रिल रोजी निवडणुका होणार असल्याने यानंतरचे दिवस म्हणजे 24 व 30 एप्रिललादेखील परीक्षा होणार नाहीत. महाविद्यालये ही निवडणुकीची केंद्रे असल्याने निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदान केंद्रासाठी निवडणूक आयोग सदर महाविद्यालये ताब्यात घेतात. मतदानानंतर मतपेट्याजमा करेपर्यंत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी निवडणूक कामात गुंतले असल्याने दुसऱ्या दिवशीच्या परीक्षा केंद्रावर जाण्यास त्यांना उशीर होण्याची शक्यता असते, त्यामुळे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीही पेपर्स होणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.
सीए परीक्षा 27 मे ते 12 जूनदरम्यान
लोकसभा निवडणुकीमुळे चार्टर्ड अकाऊंटंटची (सीए) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दी इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) ही माहिती दिली. 2 मे ते 17 मेदरम्यान सीएची परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु याच काळात देशात लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा 27 मे ते 12 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे. लोकसभेसाठी 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
























































