‘आयडॉल’चा अजब कारभार, ‘एमएमएस’च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरतपासणीत केले नापास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या ‘एमएमएस’च्या निकालात गोंधळ झाल्यामुळे फेरतपासणी करण्यात आली. मात्र यामध्ये ज्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी फेरतपासणीची मागणीच केली नव्हती अशा विद्यार्थ्यांची फेरतपासणी करून त्यांना अनुतीर्ण करण्यात आले, तर फेरतपासणीत अनुतीर्ण विद्यार्थ्यांनाही अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनेने कुलगुरू डॉ. प्रा. रवींद्र कुलकर्णी यांना निवेदन देऊन निकालातील गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे.

‘एमएमएस’च्या व प्रथम वर्ष पहिल्या सत्राचा निकाल तब्बल चार महिन्यांनंतर जाहीर झाला. त्यामध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पेपर पुनर्तपासणीकरिता अर्ज केले. परंतु या निकालातही गोंधळ उडाला. दोन विषयांत अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याला पुनर्तपासणानंतर तीन विषयांत अनुत्तीर्ण करण्यात आले. ‘एटीकेटी’ असलेल्या विद्यार्थ्यांनाही अनुत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे या गोंधळाला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल युवासेनेने उपस्थित केला आहे.

 दोन आठवडय़ांपूर्वी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्यासोबत बैठक घेऊन युवासेनेने ‘आयडॉल’चा ढिम्म कारभार समोर आणला होता. मात्र विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न अनुत्तरित असल्याने सिनेट सदस्य प्रदीप सावंत, डॉ. धनराज कोहचडे, मयुर पांचाळ, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर आणि किरण फाटक यांनी आयडॉल संचालक डॉ. शिवाजी सरगर यांना निवेदन देऊन निकाल नव्याने तपासणी करून जाहीर करण्याची मागणी केली आहे.