मुंबईकरांचे पाणी महागले, 7.12 टक्के दरवाढीला प्रशासकाची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात दोन वर्षे थांबलेली पाणीपट्टी वाढ मुंबईकरांना आता मात्र सोसावीच लागणार आहे. 2022-23 साठी 7.12 टक्के पाणीपट्टी वाढीला पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. जूनपासून पूर्वलक्षी प्रभावाने ही दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधींचा खर्च करावा लागतो. त्यामुळे पाणीपुरवठय़ाला लाभ मिळणाऱया प्रकाराप्रमाणे पालिकेकडून प्रत्येकी एक हजार लिटरमागे पाणीपट्टी आकारली जाते. महापालिकेने 2012 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी किमान 8 टक्के पाणीपट्टी वाढवता येते, मात्र मार्च 2020 पासूनच्या कोरोना प्रभावामुळे पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. मात्र या वर्षी पाणीपट्टी वाढ करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. दरम्यान, पालिकेला दरवाढीमुळे 91.46 कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज आहे.

अशी होते पाणीपट्टीत वाढ

मुंबईला शुद्ध पाणीपुरवठा करताना आस्थापना खर्च, भातसा धरणाच्या पाणीपुरवठय़ासाठी राज्य सरकारला देण्यात येणारी रॉयल्टी, धरण व इतर देखभाल खर्च, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया, विद्युत खर्च याचा विचार करून पाणीपट्टीत वाढ केली जाते.

यामध्ये आस्थापना खर्च 518 वरून 577 रुपयांपर्यंत वाढला आहे. तर प्रशासकीय खर्च 125 रुपयांवरून घटून 85 रुपये झाला आहे. मात्र विद्युत खर्च 221 रुपयांवरून 222 रुपये झाला आहे.

तर सरकारी तलावांतून घेण्यात येणाऱया पाण्याचा खर्च 87 रुपयांवरून 101 रुपये झाला आहे. तर इतर प्रचालन व परीरक्षण खर्च 81 रुपयांवरून 120.48 टक्के झाला म्हणजेच 48.74 टक्क्यांनी वाढला आहे.

अशी आहे दरवाढ (प्रतिहजार लिटर)
झोपडपट्टय़ा, चाळी, कोळीवाडे, गावठाण, आदिवासी पाडे – 4.76 पैसे
झोपडपट्टय़ांतील निवासी जलजोडण्या, प्रकल्पबाधित इमारती – 5.28 पैसे
व्यावसायिक ग्राहकांसाठी – 47.75 पैसे
बिगर व्यावसायिक संस्था – 25.46 पैसे
उद्योगधंदे, कारखाने – 63.65 पैसे
रेसकोर्स, तीन व त्याहून अधिक तारांकित हॉटेल – 95.49 पैसे
बाटलीबंद पाणी कंपन्या – 132.64 पैसे