शिवसेना, युवासेनेचा पाठपुरावा; नवीन वर्षात वरळीकरांना जलतरण तलावाची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आणि युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे नवीन वर्षात वरळीकरांना सर्व सुविधांनी युक्त अशा जलतरण तलावाची भेट मिळणार आहे. जलतरण तलावासह जॉगिंग ट्रक, ज्येष्ठ कट्टा पूर्ण झाला असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज या सर्व सुविधांची पाहणी केली आणि पालिका अधिकाऱयांना सूचना केल्या. यावेळी शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, वरळी विधानसभा युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या विशेष सहकार्याने आणि अभिजीत पाटील यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्याने या सुविधा वरळीकरांना उपलब्ध होणार आहेत.

वरळी दूध डेअरीच्या पाठीमागील बाजूला असलेला नूतनीकरण करण्यात आलेला जलतरण तलाव पोहोण्याची आवड असलेल्या मुले आणि तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. दरम्यान, लालबहादूर शास्त्री उद्यान वरळीकरांच्या विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1978 साली या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत या उद्यानाची दुरवस्था होऊन भकास स्वरूप प्राप्त झाले होते. याची दखल घेऊन युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी सतत गेली सात वर्षे मुंबई महापालिकेकडे पाठपुरावा केला. अखेर युवासेनेच्या प्रयत्नांना यश आले व उद्यानाचा कायापालट झाला.

मुले, तरुणांची स्वप्ने पूर्ण होणार
गिरणगावचा एक भाग म्हणून वरळीची ओळख आहे. परळ, डिलाईल रोड, करी रोड, लोअर परळ आणि वरळीत या परिसरात मुंबई महापालिकेचा एकही जलतरण तलाव नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने बांधलेल्या तलावात मुले आणि तरुणांना पोहोण्याचा आनंद घेता येणार असून विविध जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक असणारी तयारीही इथे करता येणार आहे. मुले आणि तरुणांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांचा पाया तयार करण्याचे कामही या जलतरण तलावामुळे शक्य होणार आहे.

वरळीतील जलतरण तलावाला लवकरात लवकर पाण्याचे कनेक्शन मिळावे, यासाठी मुंबई महापालिकेचे उपायुक्त गांधी तसेच विजेचे कनेक्शन मिळावे, यासाठी बेस्टच्या महाव्यवस्थापकांकडे आदित्य ठाकरे यांनी विशेष पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.