घोडबंदर, दिवावासीयांसाठी महापालिका टँकर पाठवणार; सवा कोटीचा खर्च, सोमवारच्या महासभेत प्रस्ताव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मार्ट सिटीचा गाजावाजा होत असलेल्या ठाणे शहरात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. विशेषकरून दिवा तसेच घोडबंदर येथील नागरिकांची तहान भागवण्यासाठी अनेक मोठ्या गृहसंकुलांना खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी भाडेतत्त्वावर पाण्याचे टँकर घेण्यात येणार असून घोडबंदर, दिवावासीयांसाठी पालिका टँकर पाठवणार आहे. त्यासाठी वर्षाला सवा कोटीचा खर्च करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सोमवारच्या महासभेत प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे.

पाणीटंचाईचे चटके ठाणेकरांना बसू लागले असताना आता शहरातील अनेक बड्या गृहसंकुलांमध्ये दररोज टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. ठाणे शहरातील घोडबंदरसह इतर काही भाग आणि विशेषकरून दिव्यात पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. दिव्यात अनेक ठिकाणी मोठ्या गृहप्रकल्पांची कामे सुरू असून काही ठिकाणी गृहसंकुले उभी राहिली आहेत. मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यानंतर या नागरिकांना पाणी देण्यास विकासक कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे आता ठाणे महापालिकेनेच मोठ्या गृहसंकुलात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.