
नगरसेवकांना मिळणारा स्वेच्छा विकास निधी आता 60 लाखांवरून एक कोटीपर्यंत वाढणार आहे. याबाबतच्या ठरावाच्या सूचनेला आज पालिकेच्या महासभेने एकमताने मंजुरी दिली. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांना आता वाढीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभागातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहे, उद्यानांचे सुशोभीकरण आदी नागरी कामे करण्यासाठी नगरसेवकांना सद्यस्थितीत 60 लाखांचा स्वेच्छा विकास निधी मिळतो. मात्र वाढती महागाई, बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ आणि मजुरीच्या खर्चात झालेल्या वाढीमुळे हा निधी वाढवावा अशा मागणीची ठरावाची सूचना शिंदे गटाच्या नगरसेविका अश्विनी मते यांनी मांडली होती. या ठरावाच्या सूचनेला सभागृहाची मंजुरी मिळाली असून आयुक्त-नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.























































