दोन वर्षांपूर्वीही केली होती नातेवाईकाचीच हत्या, झुडपातील त्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

सतरा दिवसांपूर्वी माहीम कॉजवेच्या झुडपात बेवारस आढळलेल्या मृतदेहाच्या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा अखेर वांद्रे पोलिसांनी केला. कचरा वेचक सूरज ऊर्फ काळू (30)च्या हत्येप्रकरणी विठ्ठल शिवलिंगप्पा भजंगीला कर्नाटक येथून गजाआड केले. समलैंगिक संबंधांची वाच्यता होऊ नये म्हणून विठ्ठलनेच सूरजची हत्या केली. दोन वर्षांपूर्वी विठ्ठलने त्याच्या नातेवाईकाचीही हत्या करून तो मुंबईत पळाला होता.

सूरज हा कचरावेचक होता. दिवसभर कचरा वेचल्यानंतर तो रात्रीच्या वेळेस माहीमच्या भटारखाना येथे जात असायचा. माहीमच्या हॉटेलात काम करणाऱया विठ्ठलसोबत सूरजची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्या दोघांचे समलैंगिक संबंध होते. समलैंगिक संबंधांची वाच्यता झाल्यास बदनामी होईल या भीतीने विठ्ठलने सूरजच्या हत्येचा कट रचला. सूरजच्या डोक्यात दगड घालून त्याचा मृतदेह माहीम कॉजवेच्या झुडुपात टाकून विठ्ठलने पळ काढला. 4 जानेवारीला माहीम कॉजवेच्या झुडुपात एकजण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली.

त्या माहितीनंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला केला. अप्पर पोलीस आयुक्त ( पश्चिम प्रादेशिक विभाग) मनोज शर्मा, परिमंडळ 9 चे उपायुक्त परमजीतसिंग दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गिरीश अणावकर, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस शिपाई शार्दुल बनसोडे, आनंद निकम, अशोक पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासाकरिता दोन टीम तयार करण्यात आल्या. घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी सूरजची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून अवघ्या 17 दिवसांत मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला. आज विठ्ठलला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश अणावकर यांनी सांगितले.

माहीम भटारखाना ते कर्नाटक अफझलपूर…
तपासाकरिता पोलिसांचे पथक माहीमच्या भटारखाना येथे गेले. तेथे चौकशी केल्यावर पोलिसांना एक क्लू मिळाला. उपनिरीक्षक गायकवाड यांनी धारावी, माहीम परिसरात चौकशी केली. माहीमच्या हॉटेलात सफाईचे काम करणारा एकजण गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीवरून वांद्रे पोलिसांचे पथक कर्नाटकात पोहचले. विठ्ठल हा कर्नाटकपासून 100 किलोमीटर दूर असलेल्या अफजलपूर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अफजलपूर पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी विठ्ठलला अटक केली.