
मराठी रंगभूमीला नाटय़संगीताचा समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा सांगीतिक कार्यक्रम विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगशेकर नाटय़गृहात होणार आहे. उद्या मंगळवारी रात्री 8.30 वाजता हा कार्यक्रम होत असून त्या माध्यमातून रसिकांना अजरामर नाटय़गीतांचा आस्वाद घेता येणार आहे.
‘हे सुरांनो चंद्र व्हा – वारसा नाटय़संगीताचा’ हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात ओमकार प्रभुघाटे, केतकी चैतन्य, धनंजय म्हसकर नाटय़गीते सादर करतील. हर्षल काटदरे (ऑर्गन), प्रसाद पाध्ये ( तबला), राजेंद्र भावे (व्हायोलिन), हनुमंत रावडे (पखवाज), अथर्व चांदोरकर (तालवाद्य) यांची साथसंगत लाभेल. कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका नाटय़गृहावर उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचा सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
























































