
जगातील मराठी भाषिकांना आपल्या साहित्यप्रतिभेने पन्नास वर्षांपासून मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या हस्ते 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी धाराशीव येथे होत आहे. या संमेलनाची आयोजक, मराठवाडा साहित्य परिषद, धाराशीव शाखेच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची यापूर्वीच एकमताने निवड झालेली आहे. साहित्य संमेलन अधिकाधिक अविस्मरणीय होण्यासाठी आयोजक समितीमार्फत आखणी सुरू आहे. संमेलनाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांना निमंत्रित करण्यात आले होते. धाराशीवकरांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उद्घाटन सोहळय़ास येण्याचे मान्य केले आहे. संमेलनात तीन दिवस चालणाऱया विचारमंथनातून साहित्य प्रतिभेला नवी दिशा निश्चित मिळू शकणार आहे. संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती जाहीर करण्यात येईल.
























































