नगरकर पुन्हा गारठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

उत्तरेकडून वाहणार्‍या थंड वार्‍यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगरमध्ये गारठा चांगलाच वाढला आहे. संक्रांतीनंतर उष्णता वाढेल असेच वातावरण संक्रांतीनंतर निर्माण होत असते पण यंदा उत्तरेकडील वार्‍याने नगरकर पुन्हा गारठले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून थंडगार हवा वाहत आहे. तसेच वारंवार हवामान ढगाळ असल्याने सूर्यप्रकाशही कमी पडत असल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे. आणखी एक – दोन दिवस थंडी राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. थंडीचा कडाका वाढल्याने पुन्हा एकदा शेकोट्या वाड्यावस्त्यांवर पेटवण्यात येत आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून नगरमध्ये किमान तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे, तर कमाल तापमान 28 ते 30 च्या दरम्यान आहे. यावर्षी पारा याहीपेक्षा खाली आला होता; मात्र, सध्या झोंबणारे वारे वाहत असल्याने हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. आकाश झाकोळलेले असल्याने सूर्यर्दशन होत नाही. दुपारनंतर ऊन पडले तरी तीव्रता कमी असल्याने थंडी जाणवत आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यावर, प्रवास करताना चांगलाच गारठा जाणवत आहे. उत्तरकडून वाहणारे थंड वारे आणि अलीकडेच विदर्भात झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे थंड वारे वाहत असल्याचे सांगण्यात येते. उद्यापासून आकाश निरभ्र होण्याची शक्यता आहे, मात्र थंडी आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.