
गोधनी ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्लांटमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अचानक क्लोरीन गॅसची गळती झाली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गॅस गळतीमुळे परिसरातील 40हून अधिक नागरिकांना मळमळ आणि उलटय़ांचा त्रास झाला असून 15पेक्षा अधिक जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य करत प्लांटच्या 200 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
जलशुद्धीकरण केंद्रात गळती सुरू झाल्याने गॅस हवेत पसरला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. या घटनेत बाधित झालेल्या 40 नागरिकांना तातडीने जवळच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 12 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 28 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यातील अंदाजे 4 ते 5 नागरिकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले आहे. त्यात बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसमावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांकडून तपास सुरू
गॅस गळतीचा स्रोत शोधून ती रोखण्यात यश मिळवले आहे. सध्या परिसरातील गॅसचा प्रभाव कमी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर पोलिसांकडून 200 मीटरचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी नागरिकांनी या परिसरात प्रवेश करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.




























































