बिझनेसमन नवरा नको गं बाई! नागपुरातील रितेशला 500 मुलींचा लग्नासाठी नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उच्चशिक्षणानंतर त्याने नोकरी केली पण मनासारखा पगार मिळाला नाही म्हणून व्यवसायात उडी घेतली. तिथे त्याला यश मिळालं, भरभराट झाली. शिक्षण, पैसे, गाडी, घरं असं सारंकाही असूनही त्याला एक, दोन नव्हे तर तब्बल 500 मुलींनी लग्नासाठी नकार दिला आहे. ही कहानी आहे लग्न ठरत नसलेल्या नागपूरच्या रितेश झुनके या 34 वर्षीय तरुणाची.

नोकरीत मनासारखा पगार नसल्याने रितेशने स्वतःचा मालवाहतूक व्यवसाय सुरू केला. महिन्याकाठी तो 40 हजार रुपये कमावतो. वेल सेटल्ड असूनही लग्नासाठी त्याला मुली मिळत नाही. आजवर त्याने अनेक स्थळं पाहिली, मुलींच्या पालकांशी संवाद साधला. विवाह मेळाव्यातही तो सहभागी झाला. तरीही त्याच्या पदरी निराशा पडत आहे.

मालकाहतूक क्षेत्रात असलेल्या तरूणांना वाईट सवयी असतात या पालकांच्या चुकीच्या धारणेचा बळी रितेशला व्हावं लागतंय. याबाबत रितेशच्या वहिनी ज्योत्सना झुनके म्हणाल्या, प्रेमविवाह करताना मुली त्या मुलाला रोजगार आहे की नाही हे बघत नाहीत. पण रितेशने स्वतःच्या बळावर व्यवसाय उभा केला आहे. त्याला कुठल्याही वाईट सवयी नाहीत तरीही लग्नासाठी त्याला नकार देण्याची मुलींची भूमिका चुकीचा नाही का? रितेश आणि त्याच्या कुटुंबीयांचा हा प्रश्न खरोखर निरूत्तर करणारा आणि चुकीच्या सामाजिक धारणांना उघड करणारा आहे.