काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नीट निकालावरून नरेंद्र मोदी यांच्यावर शपथविधी सोहळ्यापूर्वीच घणाघाती टीका केली. मोदींनी अद्याप पंतप्रधानपदाची शपथही घेतली नाही आणि दुसरीकडे नीट परीक्षेतील हेराफेरीने 24 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब यांना उद्ध्वस्त करण्यात आलेय, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवरून मोदींवर निशाणा साधला. एकाच परीक्षा केंद्रातील 6 विद्यार्थी सर्वाधिक गुण मिळवून अव्वल आहेत. किती जणांना असे गुण मिळालेत जे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नाही. परंतु, सरकार सातत्याने पेपरफुटीचा इन्कार करत आहे. शिक्षण माफिया आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमताने सुरू असलेल्या पेपर लीक इंड्रस्ट्रीला तोंड देण्यासाठी काँग्रेसने ठोस योजना आणली होती. आमच्या जाहीरनाम्यात कायदा करून विद्यार्थ्यांना पेपरफुटीपासून मुक्त करण्याचा संकल्प केला होता, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दरम्यान, मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे जोरकसपणे मांडेन. तरुणांनी इंडियावर विश्वास व्यक्त केला आहे. इंडिया त्यांचा आवाज दबू देणार नाही, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिले आहे.