
नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का याची तपासणी करण्यासह त्याची ओळखपरेड घेण्यास विशेष न्यायालयाने मंजूरी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मे रोजी होणार असून, त्यापूर्वी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. पुढील सुनावणीला आरोपीवर दोषारोप निश्चित करण्यात येणार असून, त्यावेळी आरोपीला कडेकोट बंदोबस्तामध्ये न्यायालयात हजर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या खटल्याच्या सुनावणीस आजपासून इन-कॅमेरा सुरुवात झाली. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर, मूळ तक्रारदारांचे वकील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, तपास अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कांबळे याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.
या प्रकरणी आरोपीची ओळखपरेड घेण्यासह तो मानसिकदृष्ट्या सक्षम आहे का हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यास परवानगी मिळावी यासाठी पोलिसांनी अॅड. मिसर यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हा अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केला असून, दोन्ही प्रक्रिया 28 मेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपीला कायद्यानुसार योग्य कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी विशेष न्यायालयाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला सत्र न्यायालयात अनुभवी वकिलाची नेमणूक करण्याबाबत पत्र पाठवून निर्देश दिले आहेत.
तरुणाने वेधले लक्ष
न्यायालयाच्या गेट क्रमांक चारजवळ गेल्या दोन दिवसांपासून एक तरुण ‘नसरापूरच्या त्या निष्पाप जिवाची किंकाळी अजूनही न्याय मागत आहे, फाशी कधी होणार?’ असा सवाल करणारा फलक हातामध्ये घेऊन उभा राहत आहे. अनेक जण या तरुणाशी चर्चा करून नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.




























































