
सामना ऑनलाईन । जम्मू
श्रीनगरातील श्री महाराज हरीसिंह हॉस्पिटलमधून पळून गेलेला खतरनाक पाकिस्तानी दहशतवादी नावेद जाटचा आज लष्कराच्या जवानांनी खात्मा केला आहे. फरार झाल्यानंतर नावेदने ‘रायझिंग कश्मीर’ या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या केली होती. तसेच त्याने सीआरपीएफ कॅम्पवर देखील हल्ला केली होता. नावेद हा कसाबनंतर पकडला गेलेला पहिला जिवंत दहशतवादी होता. मात्र या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काही दहशतवाद्यांनी नावेदला पळवून नेले होते.
Budgam Encounter #UPDATE: Naveed Jatt and another terrorist gunned down by security forces. Jatt was involved in the assassination of journalist Shujaat Bukhari #JammuAndKashmir pic.twitter.com/lWcLJwOCFp
— ANI (@ANI) November 28, 2018
जम्मू कश्मीरमधील बडगाम येथील छत्तरगाम गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. या ठिकाणी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी नावेद जाट मारला गेला असून अद्याप दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. या भागात अद्याप शोध मोहीम सुरू असून जवानांनी घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेत नावेद सोबत आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.
या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी नावेद जाट हा पाकिस्तानातील मुलतान प्रांतामधील आहे. 22 वर्षांचा नावेद जाट हा तोयबाचा दहशतवादी असून, श्रीनगर महामार्गावरील सिल्व्हर स्टार हॉटेल, सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात त्याचा सहभाग होता. 26 ऑगस्ट 2014 मध्ये नावेदला अटक केली होती. त्यानंतर 6 फेब्रुवारी 2018 रोजी नावेदला वैद्यकीय तपासणीसाठी श्रीनगरातील श्री महाराज हरीसिंह हॉस्पिटलमध्ये आणले असता तेथे काही दहशतवादी घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत नावेदला पळवून नेले होते.

























































