महाराष्ट्राच्या स्वाभिमानी, गौरवशाली परंपरेला मातीमोल करण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारनं केलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांवर केलेल्या दाव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. कर्नाटकला जशाच तसे उत्तर देण्यासाठी सीमा प्रश्नावर समन्वय साधन्यासाठी महाराष्ट्र सरकारने समितीचे नेते चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवली होती. हे दोन्ही मंत्री बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. परंतु कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी थेट पत्र पाठवून महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी घातली. आता चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचाही दौरा अचानक रद्द झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे.

दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र आजवर झुकलेला नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता ही दिल्लीलाही भूरळ पाडते. मात्र राज्याच्या विद्यमान सरकारने कर्नाटक दौरा रद्द करून या स्वाभिमानाला तडा लावून राज्यातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या संपूर्ण घटनेतून हा दौरा रद्द करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानी, गौरवशाली परंपरेला मातीमोल करण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केलं आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरद्वारे केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न अनेक वर्षांपासून कोर्टात प्रलंबित आहे. हा प्रश्न नव्याने कोर्टात गेलेला नाही त्यामुळे आता कोर्टाचा आधार घेऊन या प्रकरणातून पळ काढण्याचा प्रकार राज्य सरकार करत आहे हे स्पष्ट होते, असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

दौरा रद्द

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह महाराष्ट्रातील 42 गावांवर दावा केला होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्याला प्रत्युत्तर म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार होते. या समितीने शनिवारी 3 डिसेंबर रोजी बेळगावचा दौरा करण्याचे जाहीर केले. मात्र स्थानिकांच्या मागणीमुळे दोन दिवसांपूर्वी हा दौरा पुढे ढकलण्यात आला. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, अशा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता हा दौराच रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

फडणवीसांचं स्पष्टीकरण

”आम्हाला कर्नाटकात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विनाकारण यासंदर्भात नवे वाद सुरु करणं चुकीचे आहे. मंत्र्यांचा हा दौरा महापरिनिर्वाण साठी होता. मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. पण महापरिनिर्वाण दिनी अशा प्रकारचा वाद तयार करायचा का हा महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भातील विचार करुन मुख्यमंत्री निर्णय देतील. आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. कोणीही घाबरत देखील नाही. त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन असल्याने काय करावं याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.