नेताजी गेले, मुलायमसिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तब्बल पाच दशके उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले समाजवादी पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. समाजवादातील ‘नेताजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱया मुलायमसिंह यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

मुलायमसिंह यांच्यामागे पूत्र माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, सून डिंपल यादव, नातू यांच्यासह मोठा परिवार आहे. उद्या सैफई येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल दहा वेळा आमदार, सात वेळा लोकसभा खासदार राहिलेले मुलायमसिंह यादव हे उत्तर प्रदेशातील महत्वाचे नेते होते. तीन वेळा मुख्यमंत्री आणि 1996 ते 98 या काळात ते देशाचे संरक्षणमंत्री होते. मुलायमसिंह यांच्या निधनामुळे उत्तर प्रदेशात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कुस्तीपटू, शिक्षक ते ‘नेताजी’

– मुलायमसिंह यादव यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1939 मध्ये उत्तर प्रदेशात इटवानजीक सैफई येथे शेतकरी कुटुंबात झाला. मुलायमसिंह यांना चार भाऊ आणि एक बहीण होती.
– एका कुस्तीच्या आखाडय़ात मुलायमसिंह यांची आमदार नथू सिंह यांच्याशी भेट झाली आणि राजकारणाचा श्रीगणेशा झाला. 1967 साली मुलायमसिंह पहिल्यांदा सोशालिस्ट पक्षाकडून जसवंतनगर मतदारसंघातून आमदार झाले. 1972 मध्ये पुन्हा ते आमदार बनले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर मुलायमसिंह यांची रवानगी तुरुंगात झाली.
– 1975-77 मध्ये ते माजी पंतप्रधान चरणसिंह यांच्या लोकदलात होते. लोकदलामध्ये फूट पडल्यानंतर एका गटाचे ते प्रदेशाध्यक्ष झाले. उत्तर प्रदेश विधान परिषदेचे ते विरोधी पक्षनेते राहिले.
– 1989 मध्ये ते जनता दलात गेले आणि मुलायमसिंह पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. विशेष म्हणजे मुलायमसिंह यांच्या सरकारला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता.
– 1992 मध्ये बाबरी मस्जीद पाडण्यात आली. त्याच वर्षी मुलायमसिंह यादव हे जनता दलातून बाहेर पडले आणि समाजवादी पक्षाची स्थापना केली. त्यांना ‘सायकल’ चिन्ह मिळाले.
– 1993 मध्ये बसपाच्या पाठिंब्यावर मुलायमसिंह यादव दुसऱयांदा मुख्यमंत्री बनले.
– 2003 मध्ये सपाची पुन्हा सत्ता आली आणि ते तिसऱयांदा मुख्यमंत्री बनले. मात्र, चार वर्षांत त्यांचे सरकार कोसळले. त्यानंतर उत्तर प्रदेशात बसपा-भाजपचे सरकार आले.

पंतप्रधानपदाची हुकलेली संधी

– उत्तर प्रदेशात ‘नेताजी’ नावाने परिचित असलेले मुलायमसिंह यादव यांनी राष्ट्रीय राजकारणातही छाप पाडली. 1993ला पहिल्यांदा लोकसभेवर मैनपुरी मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर सात टर्म ते खासदार होते.
– 1993 मध्ये काँग्रेसचा पराभव इाला. भाजपला 169 जागा मिळाल्या होत्या. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाले. मात्र, 13 दिवसांत हे सरकार कोसळले. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनविण्याचा प्रस्ताव आला. माकपचे ज्येष्ठ नेते, पश्चिम बंगालचे दिवंगत मुख्यमंत्री ज्योती बसूंचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आले. मात्र, पॉलीट ब्युरोने नकार दिल्यामुळे बसू यांचे नाव मागे पडले. त्यावेळी मुलायमसिंह यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर होते. मात्र, जनता दलातील नेत्यांनी विरोध केला. अखेर एच. डी. देवगौडा पंतप्रधान बनले. देवगौडा यांनी राजीनामा दिल्यानंतर इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले. त्यावेळीही मुलायमसिंह यांचे नाव आघाडीवर होते. दोन वेळा पंतप्रधानपदाची संधी हुकली. 1996 ते 1998 या काळात ते संरक्षणमंत्री होते.

पंतप्रधान मोदी हळहळले

मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक, हळहळ व्यक्त केली आहे. ट्विटरवर पंतप्रधानांनी मुलायमसिंह यांच्याबरोबरचे आठ पह्टो ट्विट केले आहेत. ‘‘2014 मध्ये पंतप्रधानपद स्वीकारण्यापूर्वी मला मुलायमसिंह यांनी आशीर्वाद दिले होते. त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान – शरद पवार

‘‘देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची मुलायमसिंह यादव यांची इच्छा होती. मात्र, त्यापूर्वीच ते निघून गेले. त्यामुळे समाजवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला. मुलायमसिंह यांची विचारधारा डॉ. लोहिया यांच्याशी निगडित होती,’’ असे पवार म्हणाले.