
आंदोलनांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या आझाद मैदानावर पालिकेच्या माध्यमातून आंदोलकांसाठी आता कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात 10 पोर्टेबल टॉयलेट, स्वच्छतागृह आणि सफाई कामगार ठेवण्यात येणार आहेत.
‘आझाद’ मैदानावर वर्षभर अनेक मागण्यांच्या पुर्ततेसाठी आंदोलने सुरू असतात. यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर काही वेळा संपूर्ण देशातून आंदोलक येत असतात. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी या ठिकाणी अनेक आंदोलक कित्येक दिवस ठाण मांडून बसतात. मात्र आझाद मैदान परिसरात काही प्रमाणात जेवण-नाष्टय़ाची सोय होत असली तरी स्वच्छतागृहासाठी शोधाशोध करावी लागते. काही वेळा आंदोलनकर्त्यांबरोबर लहान मुलं येत असल्याने मोठी गैरसोय होते. शिवाय आझाद मैदान परिसरात अस्वच्छता झाल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पालिकेने या ठिकाणी आंदोलकांसाठी सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात कायमस्वरूपी शौचालय स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन महिन्यांसाठी बांधण्यात येणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवत कायमस्वरूपी शौचालय स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याची माहिती ‘ए’ वॉर्डाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. वैद्य यांनी दिली.

























































