नववर्षाची खाऊगिरी

>> रश्मी वारंग

नववर्षाच्या पहिल्या दिवशी स्पेनमध्ये बाकी कसली नाही तर द्राक्षे जमवाजमवीची लगबग सुरू असते. मध्यरात्री 12 च्या ठोक्याला स्पॅनिश मंडळी 12 द्राक्षे खातात. यातील प्रत्येक द्राक्ष म्हणजे नववर्षातील 12 महिन्यांचे प्रतीक. 12 पैकी किती द्राक्षे आंबट, किती द्राक्षे गोड यावरून वर्ष कसे जाणार हे ठरवले जाते. अर्थातच गंमत म्हणून हा खेळ खेळला जातो.

दक्षिण अमेरिकेत अशीच प्रथा हॉपीन जोनशी जोडली गेली आहे. चवळीसदृश ब्लॅक आय पीज, कांदा, बेकन वापरून बनवलेला हा भात नववर्षदिनी शिजतो. जेवताना या भातातील तीन चवळीचे दाणे भाग्य, भविष्य आणि प्रेम यांचे प्रतीक म्हणून काढून ठेवतात, तर काही जण त्या चवळीसदृश दाण्यांची भातातील संख्या मोजून येत्या वर्षभरात किती संपत्ती येईल याचा गमतीदार अंदाज बांधतात.

तुर्कस्थानातील प्रथा थोडी वेगळीच आहे. डाळिंबाचे दाणे दारासमोर टाकले जातात. जितके जास्त दाणे आणि लालेलाल दार तितके अधिक भाग्य उजळणार अशी इथे समजूत आहे.

इराणमध्ये नववर्षाच्या दिवशी कुकु सब्जीला महत्त्व आहे. कुकु सब्जी म्हणजे भाजी नाही, तर ताज्या भाज्या आणि अंड वापरून बनवलेला घट्ट पदार्थ. तो नववर्षाच्या पहिल्या दिवशी खाल्ल्यास वर्षभर जमीन सुपीक राहून चांगले धान्य आणि चांगल्या धान्यामुळे सुबत्ता घरी येते अशी त्यांची समजूत आहे.

सॅल्वेडॉरमध्ये मध्यरात्रीचे 12 वाजण्यापूर्वी ग्लासमध्ये अंड पह्डून ठेवतात. सकाळी त्या पह्डलेल्या अंडय़ाचा आकार साधारण कोणत्या गोष्टीशी मिळताजुळता आहे ते पाहून त्यानुसार ती गोष्ट नवीन वर्षात लाभणार असे मानले जाते.

संपूर्ण जगभरात अशा अनेक खाद्यप्रथा आढळतील. मुळात माणूस जे काही करतो ते दोन वेळेच्या भाकरीसाठी. त्यामुळे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आनंदात किंवा दुःखात खाणे जगण्याशी जुळत जाते. येत्या नव्या वर्षात आपल्यालादेखील सकस, पोटभरीचे, आरोग्य आणि आनंददायी पदार्थ लाभावे आणि जिव्हेसह मनाची तृप्ती व्हावी याच पोटभर शुभेच्छा.

मॅक्सिकोची टमाली
मॅक्सिकोची टमाली ही डिश अशीही लोकप्रिय आहे, पण नववर्षाला तिचा खास मान असतो. आपल्याकडे होळीला पुरणाची पोळी जशी घरीदारी खाल्ली जाते तसेच टमालीचेही आहे. टमाली म्हणजे मक्याच्या पिठात मांस आणि चीज भरून ते कणसाच्या आवरणात किंवा केळीच्या पानात गुंडाळून उकडले जाते. अशा उकडीचे उंडेच्या उंडे
मॅक्सिकन स्त्रिया नववर्षादिनी शेजारीपाजारी, नातेवाईकांना भेट म्हणून देतात. ही प्रथा आजही पाळली जाते.

जपानचे तोशीकोशी सोबा
जपानमधल्या तोशीकोशी सोबा या नूडल्स सूपचे महत्त्व नववर्षाला खूप खास असते. त्यामुळे या सूपला इयर एंडिंग सूप असेही म्हणतात. या सूपमधल्या नूडल्स साधारण नूडल्सपेक्षा अधिक लांब असतात. हे सूप प्यायल्यावर वर्षभर आरोग्य ठणठणीत राहते अशी जपानी समजूत आहे.