Newsclick Case गौतम नवलाखा यांच्या चौकशीसाठी दिल्ली पोलीस नवी मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gautam-navlakha

न्यूजक्लिक या डिजिटल न्यूज वेबसाइटच्या फंडिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक नवी मुंबईला पोहोचले आहेत. भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलाखा यांची चौकशी करण्यासाठी हे पथक नवी मुंबईत आले आहे. नवलाखा यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेले आहे. चीनकडून न्यूजक्लिक या वेबसाईटला फंडींग मिळाल्याच्या आणि इतर आरोपांप्रकरणी नवलाखा यांची चौकशी केली जाणार आहे.

पुण्यातील एल्गार परिषद आणि भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणाीत गौतम नवलाखा हे आरोपी असून 2018 च्या एल्गार परिषद प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने नवलाखा यांना 20 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला आहे. मात्र, न्यायालयाने आपल्या निर्णयाला तीन आठवड्यांसाठी स्थगिती दिली असून सरकारी पक्षाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची यामुळे संधी मिळाली आहे. गौतम नवलखा यांना ऑगस्ट 2018 मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर 2022 मध्ये, सुप्रीम कोर्टाने नवलाखा यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव राहत्या घरी नजरकैदेत ठेवण्यास मंजुरी दिली होती.

न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेवर चिनी कंपनीकडून आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप करण्यात आला असून न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेचे संस्थापक, पत्रकार प्रबीर पुरकायस्थ यांना दिल्ली पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात अटक केली होती. दहशतवाद विरोधी कायद्याअतंर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. या वृत्तसंस्थेचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना देखील अटक करण्यात आली होती.

न्यूजक्लिकचे एचआरहेड (नियक्ती प्रमुख) अमित चक्रवर्ती यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. ‘ऑनलाइन न्यूज पोर्टलला चीनच्या समर्थनासाठी, लॉबिंगसाठी पैसे मिळाल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी कायदा UAPA अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात सरकारी साक्षीदार होण्यासाठी परवानगी मागण्यासाठी दिल्ली न्यायालयात अर्ज केला आहे.

चक्रवर्ती यांनी शनिवारी (23 डिसेंबर) विशेष न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यासाठी आणि या प्रकरणाचा तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांकडे माहिती देण्यास इच्छुक असल्याचे सांगत अर्ज दाखल केला. आपल्याकडे यासंदर्भात पक्की माहिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे.